पत्नीला नांदायला आणत नाहीत म्हणून मुलाने केला वडिलांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 05:27 PM2019-12-03T17:27:17+5:302019-12-03T17:28:49+5:30
पतीच्या दारू पिण्याचे व्यसनाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीला नांदायला आणत नाहीत,या कारणावरून मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना थेऊर ( ता हवेली ) येथे घडली आहे.
पुणे (लोणी काळभोर): पतीच्या दारू पिण्याचे व्यसनाला कंटाळून माहेरी गेलेल्या पत्नीला नांदायला आणत नाहीत,या कारणावरून मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केल्याची घटना थेऊर ( ता हवेली ) येथे घडली आहे.
शिवाजी विष्णु तारू ( वय ६५, रा. तारमळा, थेऊर, ( ता हवेली ) यांना हाताने मारहाण करून गळा दाबून त्यांचा खून केल्याच्या कारणांवरून त्यांचा मुलगा गोपिनाथ शिवाजी तारू ( वय ३८ ) यांस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मयत शिवाजी तारू यांचे नातू अक्षय चितामणी जाधव ( वय २५, रा.चव्हाण आळी, पिंपळे गुरव पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीसार गोपिनाथ तारू यास दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी कविता ही त्याचेकडे नांदत नाही. तिला परत आणा म्हणून गोपिनाथ हा वडील शिवाजी व आई सुलोचना तारू यांना सतत शिवीगाळ, मारहाण करीत असे.
शिवाजी तारू याना अर्धागवायूचा झटका आल्याने सुमारे २ वर्षापासुन ते घरात झोपून होते. २ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास गोपिनाथ हा दारू पिऊन शिवीगाळ व दमदाटी करीत आहे,असे समजल्याने अक्षय जाधव हे आपल्या आईसमवेत तारमळा येथे पोहचले. त्यावेळी त्याचा मामा गोपिनाथ याने घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता. व तो शिवीगाळ, दमदाटी करून माझे बायको पुन्हा नांदावयास आणा असे वडिलांना म्हणत होता. यावेळी अक्षय व त्याची आई मध्यस्थी करावयांस गेले असता त्यांनाही शिवीगाळ दमदाटी केली. तेव्हा अक्षय आजी सुलोचना व आई सविता यांच्यासोबत तक्रार करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गेला. पहाटे ४ - ३० वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले, तेव्हा गोपिनाथ याने वडील शिवाजी तारू यांना घराच्या ओट्यावर आणून टाकलेले होते. त्यांची हालचाल मंदावली होती तसेच ते बोलत नव्हते. तेव्हा गोपिनाथ यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करत होता. तो शिवीगाळ करत आहे,हे पाहून सर्वजण घाबरून घरात गेले. ते सकाळी ६ - २० वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आले,त्यावेळी शिवाजी तारू हे मयत झालेले होते. त्यांचे तोडावर व हातावर काळे निळे व्रण तर गळ्यावर नखाचे व्रण होते. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार करताच पोलीसांनी गोपिनाथ याला अटक केली आहे.