पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी सोनल पाटील
By नम्रता फडणीस | Published: June 7, 2023 02:24 PM2023-06-07T14:24:16+5:302023-06-07T14:25:50+5:30
तत्कालीन सचिव मंगल कश्यप यांची बदली झाल्यानंतर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली...
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी न्यायाधीश सोनल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन सचिव मंगल कश्यप यांची बदली झाल्यानंतर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी सोमवारी (दि. ५) पदभार स्वीकारला.
पाटील या २००९ साली दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांनी औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यात न्यायदानाचे काम केले. त्यानंतर त्या कोल्हापूर येथे सहायक धर्मादाय आयुक्त होत्या. विशेष म्हणजे पाटील यांनी आठ वर्ष प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून काम केले आहे. मे २०२१ पाटील या उच्च न्यायालयातील अपील विभागात उपनिबंधक म्हणून कार्यरत होत्या. पाटील यांनी एलएलबी आणि एलएलएमची पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी मानही हक्क आणि सामाजिक कायदे विषयांत डिप्लोमा केला आहे. सध्या त्या भारती विद्यापीठमधून सायबर कायदे विषयात पीएच.डी. करीत आहेत.
न्यायालयात प्रलंबित असलेल्या तसेच दाखलपुर्व दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालत व प्राधिकरणाच्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जाणार आहेत. प्राधिकरणाच्यामार्फत कायदेशीर मदत तसेच मध्यस्थी या योजनांचा वापर करून मला गरजू आणि व्यक्तींच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवायचा आहे. शांततामय समाज निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतील.
सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण