एफटीआयआयमध्ये आंदोलनाची ठिणगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 04:51 AM2018-08-24T04:51:19+5:302018-08-24T04:51:36+5:30
एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.
पुणे : एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. या दोन वर्षांपूर्वीच्या आंदोलनाची आठवण करून देणारी ठिणगी पुन्हा संस्थेत पडली आहे. कॅमेरा क्लासरूम नाही, अभ्यासक्रम दिला जात नाही, प्रॅक्टिकल होत नाहीत, कॅमेरे उपलब्ध करून दिले जात नाहीत, मूलभूत सोयीसुविधा नाहीत, याकडे वारंवार लक्ष वेधणाऱ्या सिनेमॅटोग्राफीच्या विद्यार्थ्यांना संचालकांकडून कोणतेच उत्तर मिळत नाही. एक वर्ष विद्यार्थ्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांना गुरुवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.
आम्हाला आंदोलन करण्याची मुळीच इच्छा नाही. मात्र आमचे जे शैक्षणिक प्रश्न आहेत ते जाणून घेण्यासाठी किमान आमच्याशी संवाद तरी साधा, अशी मागणी विद्यार्थी वारंवार संचालक भूपेंद्र कॅँथोला यांच्याकडे करत आहेत. मात्र दहा विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर संचालक म्हणतात मी केवळ एक किंवा दोन विद्यार्थ्यांशी बोलेन किंवा तुम्ही संबंधित व्यक्तिंशी बोला, असे सांगतात.
आम्ही अडचणी पत्रातून सविस्तरपणे मांडल्या आहेत. पण काहीच आश्वासन मिळालेले नाही. विभागप्रमुखांनीही अडचणी सोडविल्या नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ वाढत आहे. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या अडचणी समजून न घेणे, ही वागणूक किती बरोबर आहे, असा उद्विग्न सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. आम्ही संचालकांना अडचणींचे पत्र दिले आहे. मात्र ते सातत्याने चर्चेचा चेंडू विभागप्रमुखांकडे टोलवत आहेत. आम्हाला संचालकांकडून उत्तरे हवी आहेत. यासाठी आम्हाला आंदोलन करणे भाग पडले.