डीएलएड प्रवेशासाठी विशेष फेरी, १२ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:34 PM2017-08-11T18:34:24+5:302017-08-11T18:34:53+5:30

प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जाणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या फेरीतील प्रवेश दिले जाणार आहेत.

Special round for DLE Admission, the process will start on August 12 | डीएलएड प्रवेशासाठी विशेष फेरी, १२ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार

डीएलएड प्रवेशासाठी विशेष फेरी, १२ ऑगस्टपासून प्रक्रिया सुरू होणार

Next

पुणे, दि. 11 - प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाच्या शासकीय कोट्यातील रिक्त जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविली जाणार आहे. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे या फेरीतील प्रवेश दिले जाणार आहेत. ही प्रक्रिया दि. १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 
राज्यात ९४९ अध्यापक विद्यालयांमध्ये प्रथम वर्ष डीएलएड अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राज्यस्तरीय प्रवेश सनियंत्रण समितीतर्फे राबविली जात आहे. ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेच्या पाच फे-या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, अद्यापही हजारो जागा रिक्त आहेत. या विद्यालयांत शासकीय कोट्यातील एकूण ४० हजार २६४ जागा होत्या. त्यापैकी केवळ ९ हजार ८४८ जागांवरच प्रवेश झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ४ हजार प्रवेश कमी झाले आहेत. त्यामुळे यंदा जवळपास ३० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. मागील काही वर्षांपासून डीएलएड अभ्यासक्रमाकडे वळणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत चालले आहे. अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालये ओस पडली असून काही बंद झाली आहेत. शासकीय कोटाही पूर्ण होत नसल्याने विनानुदानित विद्यालयांना घरघर लागली आहे.
हजारो जागा रिक्त राहिल्याने समितीकडून शासकीय कोट्यातील जागा भरण्यासाठी विशेष फेरी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरून मंजूर करून घेतला आहे. मात्र संस्थेत प्रवेश घेतलेला नाही, ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरूस्ती मध्ये आहे, तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरून प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत सहभागी होता येईल. याबाबतची सूचना, पडताळणी केंद्राची यादी, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. पडताळणी केंद्रावर जावून अर्ज आॅनलाइन मंजूर केल्याशिवाय प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगीनमधूनच प्रवेश घ्यावयाच्या अध्यापक विद्यालयाची निवड करायची आहे. निवड करून लगेचच प्रवेशपत्र ईमेल किंवा लॉगीनमधून प्रिंट घेवून अध्यापक विद्यालयात चार दिवसाच्या आत प्रत्यक्ष प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे प्रथम अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य मिळेल. यानंतर प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ. सुनिल मगर यांनी दिली.
--------------
प्रवेश अर्ज ऑनलाईन भरणे - दि. १२ ते १६ ऑगस्ट
कागदपत्रांची पडताळणी - दि. १२ ते १७ ऑगस्ट

Web Title: Special round for DLE Admission, the process will start on August 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.