पुणे विमानतळाच्या विकासाला मिळणार गती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 02:43 PM2020-01-03T14:43:36+5:302020-01-03T14:46:46+5:30
विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध मुद्दे तातडीने मार्गी लावण्यात येणार
पुणे : एकीकडे प्रवासी संख्या वाढत असताना जागेअभावी पायाभुत सोयीसुविधांना खीळ बसत आहे. तसेच पर्यायी रस्त्यांचा प्रश्न, हवाई दलाशी संबंधित अडचणीचे मुद्दे, नवीन पार्किंग इमारत यांसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढविण्याबाबत गुरूवारी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. विमानतळाच्या विकासाला गती देण्यासाठी विविध मुद्दे तातडीने मार्गी लावण्यात येणार आहेत.
समितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष व खासदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बैठकीला खासदार अमर साबळे, आमदार सुनिल टिंगरे, विमानतळ संचालक अजय कुमार, पालिका आयुक्त सौरभ राव, उद्योजक शांतीलाल मुथा यांच्यासह विविध क्षेत्रातील नियुक्त सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये विमानतळासाठी आवश्यक जागा, रस्ते विकास, पाणीपुरवठा, पोलिस चौकीचे स्थलांतर यांसह हवाई दलाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा झाली. तसेच इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ, मालवाहतुकीसाठी नवे टर्मिनल, विमानतळ विस्तारीकरणासाठी ३४ एकर जागेचे भूसंपादन, नवीन वाहतुक आराखडा, अत्याधुनिक ई-गेट उभारण्याबाबत पुढील वर्षभरात कार्यवाही करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
विमानतळ परिसरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी महापालिका आणि वाहतुक पोलिस एकत्रितपणे रोडमॅप तयार करतील. दहा ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे. धावपट्टी विस्तारीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाशी चर्चा सुरू आहे. तसेच नव्या इमारतीचे काम सुमारे २० टक्के पूर्ण झाले आहे. विमानसेवा वाढविण्यासाठी विमान कंपन्यांची बैठक घेणार असल्याचे बापट यांनी सांगितले. गुंजन चित्रपटगृहापासून विमानतळापर्यंत विनासिग्नल वाहने विमानतळापर्यंत जाण्याबाबत आढावा घेण्याच्या सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
------------
विमानफेऱ्यांची संख्या वाढविण्यास मर्यादा
मागील काही वर्षांपासून प्रवासी संख्येत वाढ होत आहे. मात्र जागेअभावी विमानतळाचे विस्तारीकरण रखडले आहे. हे विमानतळ हवाई दलाचे असल्याने विविध निर्बंध आहेत. आता रात्रीही निर्बंध घालण्यात आले आहेत. विविध शहरांसाठी नवीन विमानसेवा सुरू करता येऊ शकते. पण त्याला मर्यादा येत असल्याची माहिती अजयकुमार यांनी दिली.
मागील काही वर्षातील प्रवासी संख्या
वर्ष प्रवासी
२०१४-१५ ४१ लाख
२०१५-१६ ५४ लाख
२०१६-१७ ६७ लाख
२०१७-१८ ८१ लाख
२०१८-१९ ९० लाख