मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी
By admin | Published: January 25, 2017 02:29 AM2017-01-25T02:29:40+5:302017-01-25T02:29:40+5:30
महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत.
पुणे : महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार आपापल्या परीने कामाला लागले आहेत. बहुतांश पक्षांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप आपल्या उमेदवारांचे पत्ते ओपन केलेले नाहीत. अतिउत्साही इच्छुक उमेदवारी मिळाल्याच्या तोऱ्यात प्रचार करीत आहेत व वावरत आहेत. त्यामुळे काही खोडकर मतदारही अशांची फिरकी घेताना दिसून येत आहेत. ‘काय खरंच मिळाली का?’ अशी विचारणा करून त्यांना हैराण करीत आहेत.
महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार असून, एका प्रभागातून चार उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यामुळे एका पक्षाचे चार उमेदवार पॅनलमध्ये असणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे.
एका एका जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी, असाच पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण होणार आहे. सर्व जागांसाठी प्रमुख पक्षाकडे सक्षम उमेदवार असल्याचे प्रचारातून दिसत आहे. उमेदवारांची संख्या भरपूर असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पक्षश्रेष्ठी सर्वच इच्छुक उमेदवारांना मतदारांच्या संपर्कात राहा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या प्रभागात प्रचारासाठी फिरत आहेत. काही पक्षांचे सर्वच इच्छुक एकत्र प्रचार करीत आहेत, तर काही इच्छुक जमेल तसा ‘एकला चलो र’े म्हणत प्रचार करत आहेत.