ST Bus| उपचारासाठी हक्काचा पैसा मिळेना; मृत्यूनंतर देऊन काय उपयोग?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:49 PM2022-09-06T17:49:22+5:302022-09-06T17:50:01+5:30
सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे महामंडळाकडे बाकी....
पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना रजेचे पैसे आणि वेतनवाढ वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. काही जणांकडे म्हातारपणात उपचारालाही पैसे नसल्याने त्यांचे जगणे अवघड झाले आहे. मागील चार वर्षांत थकीत देणी मिळण्याआधीच ११०हून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात सेवा देऊन सुद्धा या कर्मचाऱ्यांना हक्काचे थकीत पैसे मिळाले नाहीत.
महामंडळाच्या ८ हजार ५०० निवृत्त एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हक्काचे पैसे महामंडळाकडून थकवण्यात आले आहेत. गेल्या चार वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळवण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. मात्र, अद्याप महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.
एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे बाकी..
एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पैसे महामंडळाकडे बाकी आहे. त्यांच्या हक्काचे पैसे महामंडळाने त्यांना वेळेवर पैसे द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.
काहींनी घेतला जगाचा निरोप..
सेवानिवृत्तीनंतरचे पैसे मिळण्यापूर्वीच काही कर्मचाऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या परिवारालाही अद्याप रजेचे किंवा वेतनवाढ फरकाचे पैसे मिळाले नाहीत.
रजेचे अन् वेतनवाढ फरकाचे पैसे अडकले..
अनेक कर्मचाऱ्यांचे २०१९ पासूनचे रजेचे आणि वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडे अडकले आहे. त्यांना पैशांची प्रतीक्षा आहे. पैशाअभावी सेवानिवृत्तांना जीवन जगणे अवघड झाले आहे. आजारी कर्मचाऱ्यांना उपचार करताना अडचणी येत आहेत.
उपचारासाठीही पैसा मिळेना
तरुणपणात या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली. प्रसंगी कुटुंबापासून दूर राहून लोकांना सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र, सेवानिवृत्तीनंतर त्यांना उपचारासाठीही पैसे मिळत नाही. अशा अनेक कर्मचाऱ्यांना त्रास भोगावा लागत आहे.
निवृत्तीवेळीच पैसे देण्याचे परिपत्रक
- सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळीच सर्व पैसे देण्याचे परिपत्रक शासनाने निर्गमित केले आहे.
- परिपत्रकानुसार सेवानिवृत्तांना तत्काळ भविष्यनिर्वाह निधीची रक्कम देणे आवश्यक आहे.
- निवृत्तीनंतर तत्काळ पैसे मिळाल्यास सेवानिवृत्तांना निवृत्तीनंतरचे जीवन सोपे होईल. म्हातारपणातील आजारावर उपचार करता येईल. मात्र परिपत्रकही दुर्लक्षित केले जाते.