ST Strike: लालपरी धावण्यासाठी एसटी अधिकारी कधी कर्मचाऱ्यांच्या घरी तर कधी शेताचा बांधावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 01:35 PM2022-01-17T13:35:13+5:302022-01-17T13:46:56+5:30
बस जागेवर उभ्या असल्याने त्या नादुरुस्त होण्याची भीती आहे
पुणे: ST Strike: विविध हातखंडे वापरून देखील संपकरी एसटी कर्मचारी (st parivahan strike) कामावर येत नसल्याने आता एसटी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली आहे. कर्मचाऱ्यांना मनविण्यासाठी व त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे घर गाठत आहेत. घरी जाऊन त्यांनी कामावर यावे अशी साद घालत आहेत. अनेक कर्मचारी ग्रामीण भागात राहत असल्याने गावं खेड्यात जाऊन त्यांना विनवणी केली जात आहे. या कामी गावांतील वजनदार व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यची देखील मदत घेतली जात आहे. यासाठी एसटी प्रशासनाने विविध पथके देखील तयार करून रवाना केली आहे.
दोन महिने उलटून देखील एसटीचा संप सुरूच आहे. एसटी प्रशासनाने आता पर्यत जवळपास 11 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले जवळपास 3,500 कर्मचाऱ्यांना बडतर्फ त्याचा कोणताही परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला नाही. दरम्यान खासगी चालक व निवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा देखील प्रयोग फसल्याने आता एसटी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना घरीच गाठून त्याचे मनपरिवर्तन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. पुणेसह राज्यातील सर्व विभागात ह्याच पद्धतीने काम केले जात आहे. या संपामुळे नागरिकांचे हाल तर होत आहेतच, पण एसटी महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला आहे.
बस जागेवर उभ्या असल्याने त्या नादुरुस्त होण्याची भीती आहे. तसेच आता बरेच दिवस झाल्याने प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना विनंती केली जात आहे. कारण एसटी महामंडळ कितीही झाले तरी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही. म्हणूनच आता प्रशासनाकडून नरमाईची भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांच्या घरी जावे लागत आहे. अनेक कर्मचारी ग्रामीण भागात राहत असल्याने अधिकारी प्रसंगी बांधावर जात आहे. कर्मचारी कामांवर परत यावे म्हणून सरपंचाला मध्यस्थी करण्याची गळ घातली जात आहे.
आमचे हजारो कर्मचारी ग्रामीण भागात राहतात. त्यांना आवाहन करण्यासाठी कर्मचारी व आगार व्यवस्थापक दर्जाचे अधिकारी घरी जात आहेत. ते कामांवर परतावे हीच अपेक्षा आहे.
-सुहास जाधव, सरव्यवस्थापक (वाहतूक), राज्य परिवहन महामंडळ, मुंबई