एसटीप्रमाणेच तिकीट दर आकारा, जिल्हाधिका-यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 03:07 AM2017-10-19T03:07:13+5:302017-10-19T03:07:38+5:30
खासगी बस आणि वाहनांनी प्रवास करणा-या प्रवाशांकडून एसटीच्या तिकीट दराप्रमाणेच तिकीट भाडे आकारावे, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत.
पुणे : खासगी बस आणि वाहनांनी प्रवास करणा-या प्रवाशांकडून एसटीच्या तिकीट दराप्रमाणेच तिकीट भाडे आकारावे, असे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. एसटी संपाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन सूचना दिल्या. खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकीच्या बस, मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता देण्यात आली आहे. अभियांत्रिकी मैदानावरून ही वाहने सोडण्यात येत आहेत. एसटीच्या पुणे विभागाकडील ४५० बसद्वारे दिवसाला सुमारे चार हजार फे-या होत असतात. त्या सर्व मार्गांवर खासगी वाहनांद्वारे प्रवाशांसाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आणखी बस ताब्यात घेऊन वाहनांची संख्या एक हजार केली जाणार आहे. ज्यांनी आॅनलाइन बुकिंग केले असेल त्यांना रिफंड दिला जाणार आहे. मात्र, खासगी वाहनाने प्रवास करताना तिकीट घ्यावे लागेल. आधीच्या तिकिटाचे पैसे परत मिळतील. पुण्यातील महत्त्वाच्या शिवाजीनगर व स्वारगेट आणि पिंपरी-चिंचवड येथील आगारांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगारांमधील एसटी बसेस अन्यत्र हलवून त्याठिकाणी खासगी बससाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. संपकरी कर्मचाºयांनी गैरप्रकार केल्यास त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, पीएमपीच्या १२५ बसेसही शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाढविण्यात आल्या आहेत. प्रत्येक एसटी डेपोबाहेर या बसच्या माध्यमातून वाढीव फेºया केल्या जाणार आहेत. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा झाल्याचे राव यांनी सांगितले.
वाहक-चालकांचेही हालच
मंगळवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाºयांचा संप सुरू झाल्यानंतर, राज्यातील विविध डेपोमधून गाड्या घेऊन आलेले चालक-वाहक पुण्यात आले़ गाडी डेपोत लावून ते संपात सहभागी झाले़ मंगळवारी रात्री त्यांना एसटी डेपोमधील विश्रांतीकक्षात राहायची परवानगी देण्यात आली़ त्यानंतर बुधवारी सकाळी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयातून राज्यातील सर्व विश्रांतीकक्ष बंद करण्याचे आदेश देण्यात आले़ त्यानुसार पुण्यातील तीनही प्रमुख बसस्थानकावरील विश्रांतीकक्ष बंद करण्यात आले़ शिवाजीनगर डेपोत बाहेर गावाहून आलेले सुमारे ४०० चालक-वाहक आहेत़ त्यांच्याजवळ पुरेसे कपडेही नाही़ रात्री आता त्यांना बसस्थानकातच मुक्काम करावा लागणार आहे़
अनेकांच्या सुट्ट्या गेल्या वाया
ऐनवेळी होणाºया गर्दीमुळे एसटीत जागा मिळणार नाही म्हणून अनेकांनी अनेक दिवस अगोदर मंगळवारी दिवसभरात निघणाºया गाड्यांमध्ये बुकिंग केले होते. मात्र, संपामुळे एकही गाडी मार्गस्थ न झाल्याने त्यांची मोठी पंचायत झाली. यातील काहींनी खासगी बसला तिप्पट दर देण्यापेक्षा बुधवारी संप मिटला की गावी जाऊ, असे ठरविले होते. मात्र, बुधवारीही संप सुरूच राहिल्याने त्यांचे नियोनजही फसले आणि बुधवारची सुटीदेखील वाया गेली. त्यामुळे त्यांनी गावाला न जाता पुण्यात राहण्याचे ठरविले़
स्वारगेटहून १६८ गाड्या
खासगी व्यावसायिकांना बसस्थानकात जागा उपलब्ध करुन दिल्याने स्वारगेटहून बुधवारी दिवसभरात १६८ खासगी गाड्या विविध ठिकाणी रवाना करण्यात आल्या़ त्यांनी एसटीप्रमाणेच भाडे आकारावे, अशी अट टाकण्यात आली होती़ तसेच, शिवाजीनगर येथील बँक आॅफ महाराष्ट्रसमोरुन काही गाड्या सोडण्यात आल्याचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले़
२ कोटींचा महसूल बुडाला
पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्थानक, पिंपरी-चिंचवड, आदी डेपोंमधील एकही गाडी बुधवारी मार्गावर आली नाही. त्यामुळे मंगळवार व बुधवार मिळून एसटीचा सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
- श्रीनिवास जोशी,
विभागीय नियंत्रक