ST Workers Strike: एसटी बंदमुळे रेल्वेकडे धाव पण तिथेही पदरी निराशाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 06:51 PM2021-11-08T18:51:39+5:302021-11-08T19:08:14+5:30
पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवाशी नीरा बस स्थानकातून ये - जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे (msrtc strike, st strike)
नीरा(पुणे): दिपावलीच्या सुट्टीनंतर आता शहरातील चाकरमानी परतीच्या प्रवासावर आहेत. त्याच एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. शनिवार, रविवार व सोमवारी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यातच फक्त कोयना एक्स्प्रेसच सध्या सुरु असल्याने नीरा रेल्वे स्टेशनला प्रचंड गर्दी होत आहे. आज कोयना एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने नीरा व परिसरातील प्रवाशांना गाडीत चढणेही मुश्किल झाले होते.
पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवाशी नीरा बस स्थानकातून ये - जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे. एसटी बसला पर्याय म्हणून गेली तीन दिवस मोठ्या प्रमाणावर प्रवाशी रेल्वेने प्रवास करताना दिसत आहेत. नीरा रेल्वे स्टेशन वरून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत.
दिवसभरात पुण्याला व साताऱ्याला जाण्यासाठी दोन पॅसेंजर व तीन एक्स्प्रेस असतात. पण सध्या फक्त दिवसाची कोयना एक्सप्रेस तर नागपूर येथे जाण्यासाठी महाराष्ट्र एक्स्प्रेस आहे. गेली दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने नीरा रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नात सरासरी पंधरा टक्के वाढ झाली असल्याचे प्रभारी सहाय्यक स्टेशन प्रमुखांनी सांगितले.
दिपावलीच्या सुट्टीनंतर सैनिकांसह इतर चाकरमानी परतीच्या प्रवासावर आहेत. पण एसटी कामगारांचा संप व एकच एक्स्प्रेस सुरु त्यातही फक्त रिजर्वेशन तिकीट त्यामुळे काही लोक विना तिकीट प्रवास करत आहेत, तर काही तिकीट खिडकीवर विनंती करुन तिकीट मागत होते. तिकीट न मिळाल्याने काही प्रवाशांनी रस्त्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करणे पसंद केले.