Murlidhar Mohol: पुणे मेट्रोच्या थांबलेल्या कामाचा निर्णय येत्या ८ दिवसांत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:08 PM2021-10-15T15:08:17+5:302021-10-15T15:09:05+5:30
गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींची मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज पुलावरून जाते. पुलावरून जाणाऱ्या मेट्रोच्या गर्डरमुळे गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक खंडोजीबाबा चौकाकडे जाण्यास अडचण निर्माण होईल, असा आक्षेप मंडळांनी घेतला होता. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मेट्रोचे काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मेट्रो, गणेशोत्सव मंडळ प्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक घेतली जाईल असे सांगितले होते. गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले आहे.
त्यानुसार महापौर निवास येथे संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमहापौर सुनीताताई वाडेकर, महामेट्रोचे महाव्यवस्थापक श्री. ब्रिजेश दीक्षित, सभागृह नेते गणेश बिडकर, काँग्रेस गटनेते श्री. आबा बागुल, गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मेट्रोच्या थांबलेल्या कामाबाबत आठ दिवसांत निर्णय !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2021
गणेशोत्सव मंडळांनी उपस्थित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुलावरील मेट्रोच्या गर्डरच्या उंचीबाबतच्या विषयात येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार असून या कामाबाबत मध्यममार्ग काढण्यावर एकमत झाले आहे. pic.twitter.com/xyssCKMFVY
''मेट्रोच्या कामाबाबत निर्माण झालेल्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असून गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या सूचना, कल्पना आणि पर्याय याची सविस्तर माहिती घेतली आहे. बैठकीस मेट्रोच्या तांत्रिक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित असल्याने यावर लवकरच तोडगा काढण्यात यश येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.''
मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा
पुण्यातील गणेशोत्सव हा समाजभान जपणारा उत्सव म्हणून जगभर ओळखला जातो. या विषयातही समाजभान जपत याबाबत मध्यम मार्ग काढण्याच्या निर्णयाला गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी एकमताने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याबाबत विलंब न करता येत्या आठ दिवसातच याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.