लोणावळा- पुणे लोकल सुरू करा : खासदार श्रीरंग बारणेंची रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 06:15 PM2020-09-18T18:15:03+5:302020-09-18T18:15:35+5:30
पुणे- लोणावळा लोकल बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना करावा लागतोय मोठा मनस्ताप सहन...
पिंपरी : कोरोना लॉकडाऊनमुळे लोणावळा ते पुणे आणि पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकलरेल्वे सेवा बंद असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्याकरिता मुंबईच्या धर्तीवर सरकारी कर्मचाऱ्यांकरिता लोणावळा ते पुणे लोकलरेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खासदार बारणे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. बारणे म्हणाले, ‘‘कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली होती. राजधानी, एक्स्प्रेस रेल्वे, माल वाहतूक करणाºया रेल्वे बंद केल्या होत्या. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे. लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा सुरू होती. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊमुळे मागील सात महिन्यापासून लोकल सेवा बंद आहे. परंतु, अनेक सरकारी कर्मचारी लोकल रेल्वे सेवेने प्रवास करत होते. रेल्वे बंद झाल्याने सरकारी कर्मचारी वेळेत कार्यालयात पोहचू शकत नाहीत.
कार्यालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लोणावळा पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा सुरू करावी. जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील.’’