सांगली-आळंदी बस सुरू करा; दिघीतील नागरिकांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 02:02 PM2018-02-23T14:02:10+5:302018-02-23T14:05:08+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र विभागाकडून कोणतेही उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे व्यक्त केली आहे.
दिघी : परिसरात स्थायिक झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक दोन वर्षांपासून आळंदी ते सांगली बससेवा सुरू करण्याची मागणी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली विभाग, कोल्हापूर विभाग व पुणे येथील प्रादेशिक कार्यालयात बससेवा सुरू करण्याबाबत वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र या विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे दिघीतील सामाजिक संस्थांनी आपली व्यथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
दिघीकर विकास प्रतिष्ठान व अजिंक्यतारा मित्र मंडळाचे रवी चव्हाण, उत्तम घुगे, मोहन कांबळे, राजेंद्र राऊत, संतोष जाधव, प्रशांत कुऱ्हाडे, गुलाबहुसेन शिलेदार, विलास भोसले, सतीश खरात, सुरेश राऊत, पांडुरंग म्हेत्रे यांनी भोसरीतील एका कार्यक्रमात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. एसटीच्या सांगली, कोल्हापूर विभागाकडे निवेदन देऊन २०१६ पासून याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.; मात्र बस सुरू झाली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.