नारायणगाव : येडगाव धरणातून कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे २.३ टीएमसी पाणी ७०० क्युसेक्स वेगाने सोडण्यास शनिवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून सुरुवात करण्यात आली आहे. पुणे, नगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांना पाणी मिळावे, यासाठी पोलीस बंदोबस्तात हे पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पुणे विभाग लाभक्षेत्र विभागाचे अधीक्षक अभियंता आर. डी. शिंदे व कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता जी. बी. नन्नोर यांनी दिली. पिंपळगाव जोगा धरणातील मृतसाठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे. सोलापूर, नगर, पुणे व बीड जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी केली होती. पुण्याचे विभागीय आयुक्त यांनी दि. ५ एप्रिल रोजी बैठक घेऊन दि. १६ एप्रिलपासून जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणातील पाणी येडगावमध्ये घेऊन ते पाणी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्याद्वारे फक्त पिण्यासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. हे पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा वापर शेतीसाठी किंवा इतर कारणांसाठी केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा पुणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने दिला आहे. पाणी सोडण्यासाठी कुकडी पाटबंधारे विभागाने महसूल विभागामार्फत पोलीस बंदोबस्त मागविला आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये हे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ज्या धरणांमध्ये ४ टीएमसीपेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, त्या धरणातून पिण्याबरोबरच जनावरे व फळबागा वाचविण्यासाठी कुकडीतून आवर्तने देण्यात यावे. अशी मागणी यापूर्वी नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खा. दिलीप गांधी, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. राहुल जगताप, आ. विजय औटी, आ. बाबूराव पाचर्णे, आ. नारायण पाटील, आ. स्नेहलता कोल्हे, आ. बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते यांनी केली होती.
येडगाव धरणातून विसर्गास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2016 2:53 AM