इतिहासकालीन मस्तानी तलावाच्या खोलीकरणाला पीएमआरडीए कडून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:04 PM2018-04-30T14:04:46+5:302018-04-30T14:04:46+5:30
१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
पुणे: महानगर क्षेत्रातील वडकी गावांतर्गत ऐतिहासिक मस्तानी तलावाचे खोलीकरणाचे काम शनिवार( दि २८ एप्रिल) पासून सुरु करण्यात आले. तलाव खोलीकरणाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे महानगर आयुक्त किरण गित्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
१४ एकर क्षेत्रावर या तलावाची निर्मिती इसवी १७२० दरम्यान केली गेली. या तलावामध्ये पाणी साठा झाल्यास परिसरातील ४ गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तलावाची खोली भरपूर असल्यामुळे घाटातून वाहून जाणारे पाणी तसेच पावसाळ्यात नदीतून वाहून जाणारे पाणी पंप करून तलावात सोडले जाऊ शकते. मस्तानी तलावात सुमारे ५०,००० ब्रास गाळ असल्याचा अंदाज जलसंपदा विभागाने केला आहे. कामाची सुरुवात १ जेसीबी मशीन आणि २ टिपरने झाली तर परिसरातील उद्योजक आणि गावकऱ्यांनी अजून मशीन्स उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. पीएमआरडीए क्षेत्रात विविध तलावांचे खोलीकरण करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सूचनेवरून ३ कोटी निधी मंजूर केल्यानंतर अशाप्रकारची जलसंधारणाची कामे परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने भविष्यात पाणी टंचाईवर मात होणार आहे.