एमपीएससीतर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबरला जाहीर करण्यात आला. सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक आयुक्त, उपशिक्षणाधिकारी, कक्षाधिकारी, नायब तहसीलदार अशा विविध पदांसाठी एकूण २०० जागांसाठी राज्य सेवा परीक्षा घेतली जात आहे. तसेच, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २७ मार्च २०२१ रोजी घेण्यात आली. या पूर्व परीक्षेचा निकाल ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला.
दोन्ही पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे मुख्य परीक्षा केव्हा होणार याकडे लक्ष लागले होते. उमेदवारांकडून मुख्य परीक्षांच्या तारखा लवकर जाहीर कराव्यात, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षा अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हा केंद्रांवर होणार आहे, असे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.