क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार - राहुल जाधव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 01:06 AM2018-11-14T01:06:30+5:302018-11-14T01:07:32+5:30
राहुल जाधव : महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविणार
पिंपरी : येथील महात्मा फुले पुतळा स्मारकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे़ तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसविण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर राहुल जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या मागे भोसरी रस्त्यावर महात्मा फुले स्मारक उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी महात्मा फुले यांचा पुतळा आहे. स्मारक समिती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक महापौर दालनात झाली.
यावेळी मानव कांबळे, वैजनाथ शिरसाठ, बन्सी परांडे, नंदा करे, आनंदा कुदळे, हणमंत माळी, अॅड. रवींद्र कुदळे, विश्वास राऊत, गिरीश वाघमारे, लक्ष्मण राऊत, विलास गव्हाणे, नीरज कडू, गुलाब पानपाटील, राजकुमार परदेशी, विलास गव्हाणे, सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रभावती गाडेकर, महादेव सिंदे, आर. एम़ पवार आदी उपस्थित होते. या वेळी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यामध्ये येथील गं्रथालय सुरू करावे, सांस्कृतिक हॉलचे नामकरण, महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करणे, फुले दाम्पत्यावर चित्रफीत करावी, स्मारकाच्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, कारंजे सुरू करावे, मेघडंबरी उभारावी, दिशादर्शक फलक चौकात उभारावा, स्मारकाच्या ठिकाणी फुले दाम्पत्यावर चित्रकृती उभारण्यात यावीत अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
महात्मा फुले स्मारकासंदर्भातील विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. त्या वेळी महापालिका पातळीवरील प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच याठिकाणी सावित्रीबार्इंचा पुतळा तातडीने बसवावा, तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मेघडंबरी बसवावी, जिना हा लोखंडी ऐवजी आरसीसीचा करावा, अशा सूचना केल्या आहेत. यासंदर्भात कार्यवाहीचे आदेश प्रशासनास दिले आहेत. - राहुल जाधव, महापौर