कुटुंबाच्या चरितार्थासाठी ‘नकुसा’च्या हाती गाडीचे ‘स्टेअरिंग’; घाटरस्त्यात रात्रंदिन प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 11:18 AM2019-12-11T11:18:01+5:302019-12-11T11:22:11+5:30
आनंद महिंद्रा यांनीही घेतली ‘नकुसा’ची दखल
नम्रता फडणीस-
पुणे : सध्याच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना एक ‘वाघीण’ मात्र रात्रीच्या वेळेस घाटवळणातला प्रवास पार करीत आहे. हा ‘ती’चा दिनक्रम गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे. काही वाईट अनुभव वाट्याला देखील आले; पण ही ‘वाघीण’ डगमगली नाही. या वाघिणीचे नाव आहे, ‘नकुसा म्हासाळ’. नकुसाने नवरा गेल्यानंतर स्टेअरिंग हातात घेत आपल्या पिल्लांचा सांभाळ केला आहे. घाट वळणातील प्रवास ‘ती’ खंबीरपणे करीत असून, कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे.
‘नकुसा म्हासाळ’ यांची कहाणी काहीशी वेदनादायी; पण तितकीच प्रेरणादायीदेखील आहे. अॅड. दीपा चौंदीकर यांनी नकुसा त्यांच्याविषयीची माहिती आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पडला. त्यानंतर नकुसा यांची स्टेअरिंगवरची हुकुमत खºया अर्थाने जगासमोर आली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील बसपाची वाडी हे त्यांचे गाव. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. अठराव्या वर्षी त्यांच्या पदरात तीन मुले पडली. वयाच्या तेविसाव्या वर्षी नवरा गेला आणि मुलांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला. माहेरी आश्रित म्हणून त्या राहिल्या नाहीत. नकुसा या अशिक्षित. चारचाकी गाडी हाच त्यांचा धंदा होता. गाडी पुढे-मागे करण्यापर्यंतच त्यांना ड्रायव्हिंगची माहिती होती. म्हणून त्यांनी गाडीवर पगारी ड्रायव्हर ठेवला. व्यापाºयाकडून भाजीचा माल गाडीत टाकायचा आणि मग रोज कोकणात त्याच्याबरोबरीने जाऊन विकायचा. ही कसरत करण्यासाठी आंबा घाट ओलांडायचा होता. पण त्या ड्रायव्हरला घाटातून गाडी चालविण्याचा अनुभव नसल्याने त्याने नकार दिला आणि मग गाडीच्या किल्ल्या पुन्हा त्यांच्याच हातात आल्या. त्यांनी पहिल्यांदा
घाटात गाडीचे स्टेअरिंग हातात
घेतले आणि तो घाट सुखरूप पार केला. तेव्हापासून हा प्रवास आजतागायत असाच सुरू आहे. नकुसा या बोलायला काहीशा लाजºयाबुजºया असल्याने त्यांचा हा प्रवास त्यांच्या वतीने अॅड. दीपा चौंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना कथन केला.
रात्रीच्या वेळेस प्रवास करताना नकुसा यांना अनेक वाईट प्रसंगांनाही सामोरे जावे लागते. ट्रक ड्रायव्हर कधीकधी रस्त्यावर गाडी चालविताना त्यांची गाडी दाबण्याचा प्रयत्न करतात; पण त्या घाबरत नाहीत. कधीकधी रात्री गाडी पंक्चर झाली तर त्या स्वत: गाडीचे पंक्चर काढतात. खूप पूर्वी त्या त्यांची तीन लहान लेकरे घेऊन प्रवास करायच्या; पण आज त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत प्रवास करतो, असे चौंदीकर यांनी सांगितले.
......
* प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटवर खूप सक्रिय असतात. हे सर्वश्रुत आहे. समाजातील अशा संघर्षमयी व्यक्तींची दखल त्यांनी अनेकदा घेतली. नुकतेच असेच एक ट्विट त्यांनी केले होते. त्यांनी महिंद्रा बोलेरो
गाडी चालवणाºया एका महिलेचा मी शोध घेत असून, या महिलेबद्दल मला अधिक जाणून घ्यायची इच्छा आहे, असे म्हटले होते.