लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: एसटी बसने ट्रकला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एसटीमधील प्रवासी बालंबाल बचावले आहेत. त्यांना किरकोळ मार लागला आहे. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर झाला. या प्रकरणी एसटीचालक बाबूराव अण्णा दहिफळे (रा. पांगरी) यांच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे येथून नाशिकला जाणारी एक बस (एमएच १४, बीटी ४०८२) मंचर स्थानकावर थांबली. येथील थांबा घेतल्यानंतर बस पुन्हा नाशिककडे निघाली होती. यावेळी बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. एसटी बसमधील काही प्रवासी उभे होते. या बसच्या समोर एज ट्रक (एच आर ५५ एए १४१४) हा चाकण येथून एका कंपनीचे साहित्य घेऊन दिल्लीकडे निघाला होता. पुणे-नाशिक महामार्गावर मंचर गावच्या हद्दीत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर एसटी बस या कंटेनरच्या पाठीमागूनच सुमारे तीन फूट अंतराने पुढे जात होती. ही दोन्ही वाहने मार्केट यार्डसमोर आली असताना एसटी चालकाने जोरात ब्रेक दाबून समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. ही धडक जोरात असल्याने एसटीतील प्रवासी एकमेकांवर आदळले. यामध्ये प्रवाशांच्या डोक्याला, तोंडाला, छातीला, पायाला, हाताला जखमा होऊन मुका मार लागला आहे. यामध्ये काही महिला प्रवासीही जखमी झाल्या आहेत. सुदैवाने एसटीतील प्रवासी बालंबाल बचावले आहेत. या प्रकरणी कपिलदेव तुलशीराम चव्हाण (रा. ओरिपूर, ता. गौरीगंज, अमेठी, उत्तर प्रदेश) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एसटी बस चालक बाबूराव अण्णा दहिफळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे.