जिल्हा न्यायालय परिसरातून वर्षभरात २० दुचाकी चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:29 PM2018-04-16T13:29:35+5:302018-04-16T13:29:35+5:30
जिल्हा न्यायालयात येणा-या व्यक्तींसाठी गेटनंबर १ व ३ बाहेर रेल्वे ट्रॅकच्या बाजुला दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय आहे.
पुणे : विविध कामांसाठी शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात येणा-या पक्षकार व वकिलांच्या वर्षभरात सुमारे २० दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे. विविध खटल्यांच्या कामासाठी तसेच वकिली करण्यासाठी जिल्हा भरातून नागरिक याठिकाणी दाखल होत असतात. न्यायालयात येणा-या व्यक्तींसाठी जिल्हा न्यायालयात व गेटनंबर १ ते ३ बाहेर रेल्वे ट्रॅकच्या बाजुला दुचाकी व चार चाकी वाहनांसाठी पार्कींगची सोय आहे. न्यायालयातील सर्व गेटवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष वाहने ज्या ठिकाणी पार्क होतात. त्याठिकाणी सीसीटीव्हीची संख्या अतिशय नगण्य आहे.
मुळात अन्याय झालेले अनेक लोक याठिकाणी येतात. त्यात वाहने चोरीला गेल्यास त्यांचा मनस्ताप वाढत आहे. एक प्रकरण संपत नाही तेच दुसरी समस्या उभी राहिल्याची भावना त्यांच्यात निर्माण होत आहे. दरम्यान सध्या न्यायालय परिसरात असलेली पार्किंगची जागा देखील अपुरी आहे. त्यामुळे पक्षकार व वकील मिळेल जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावतात. त्यामुळे न्यायालयाच्या आत व बाहेर देखील वाहतूक कोंडी होत असते. त्यात न्यायालयात लोकअदालत किंवा इतर काही कार्यक्रम असल्यास पार्किंगची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे पार्किंगची जागा वाढवून त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर आवश्यक सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी वकील व पक्षकार करत आहेत.
सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवणे गरजेचे :
न्यायालयाच्या बाहेर पार्क करण्यात येणा-या गाड्यांच्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे त्या वाहनांवर कोणताही वॉच नाही. याचाच फायदा घेत चोरटे गाड्या चोरत असल्याचे प्रकार होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.
यापूर्वीही चोरीच्या घटना :
कोर्टरूममधून फाइल चोरीला जाणे, नळ चोरीला जाण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोर्टाची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्यासाठी उपाययोजना राबविण्याची मागणी वकील आणि पक्षकारांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. कोर्टातील सुरक्षाव्यवस्था अपुरी असल्याचा फटका पक्षकारांनाही बसत आहे. काही वर्षांपूर्वी कोर्टाच्या आवारात खून झाल्यामुळे तेथे पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र, हा बंदोबस्तही सध्या कमी पडत आहे.
..................
न्यायालयाच्या बाहेर पार्क करण्यात येणा-या वाहनांवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्याठिकाणी कोणीही वाहन लावून जाते. तसेच तेथे पे अॅन्ड पार्क नसल्याने जास्त सुविधा देखील पुरविता येत नाही. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये बाहेर पार्क असलेल्यांची संख्या जास्त आहे. तरी देखील असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
प्रकाश सहा, पोलीस निरीक्षक, कोर्ट चौकी