पुन्हा चोरले चंदनाचे झाड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 03:00 AM2018-10-28T03:00:38+5:302018-10-28T03:01:00+5:30
२५ तारखेला गुरुवारी रात्री दीडच्या दरम्यान मेनगेटपासून फक्त १०० फुटावरून चोरट्यांनी चंदनाचे अख्खे झाडच तोडून नेले.
कात्रज : जगभरातील प्रेक्षकांचे पुण्यात आल्यावर आवर्जून भेट देण्याचे ठिकाण म्हणजेच कात्रज प्राणिसंग्रहालय. सध्या वेगवेगळ्या चोऱ्यांमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. २५ तारखेला गुरुवारी रात्री दीडच्या दरम्यान मेनगेटपासून फक्त १०० फुटावरून चोरट्यांनी चंदनाचे अख्खे झाडच तोडून नेले. मात्र रामभरोसे सुरक्षा असलेल्या येथील कर्मचाºयाला चोरटे पळून गेल्यावर चोरीची माहिती झाली. विशेष म्हणजे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तोंडावरच हा प्रकार घडला आहे.
मागील डिसेंबर महिन्यात देखील या ठिकाणी दोन वेळा येथील चंदनाची झाडे चोरट्यांनी तोडून नेली, त्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांना मिळाले मात्र या चोरांना पकडण्यात अजून यश येथील पोलिसांना आले नाही. या वेळी तर चोरट्याने या ठिकाणी बसवलेल्या लाखो रुपयाच्या सीसीटीव्हीमध्ये आपण येणार नाही याची पक्की काळजी घेतली आहे.
कारण एकाही सीसीटीव्हीमध्ये हे चोरटे दिसले नाहीत. सैनिक इंटेलिजन या कंपनीकडे येथील सुरक्षिततेची जबाबदारी दिली आहे. कारण या पूर्वी स्पायडर कंपनीची सुरक्षितता होती. त्या वेळीही चोरी झाल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा बदलण्यात आली. या चोरीच्या वेळी सैनिकचे पाच व मनपाचे दोन कर्मचारी रात्रपाळीला कामावर होते. रजिस्टर नोंदी असल्यामुळे किती कर्मचारी खरे हजर असतात या विषयी संशय निर्माण होतो.
या सर्व प्रकारामुळे कोट्यवधी रुपये पालिकेला कमवून देणारे व सुमारे १८ लाख प्रेक्षक असलेल्या या प्राणिसंग्रहालयाच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाही दिवे, नाही सीसीटीव्ही
सैनिकचे कर्मचारी रवी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी मागच्या वर्षी ज्या ठिकाणचे झाड चोरले गेले आहे त्याच्याच बाजूचे हे झाड चोरले गेले आहे. या ठिकाणी लाईटदेखील नाही. तसेच सीसीटीव्हीदेखील बसवला गेलेला नाही. तसेच या संग्रहालयाच्या अनेक भिंतीदेखील तुटलेल्या आहेत.