नरेंद्र दाभोळकर हत्या तपासाबाबत कडक भूमिका घ्यायला हवी; सुप्रिया सुळेंचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 02:26 PM2022-03-20T14:26:20+5:302022-03-20T14:26:39+5:30
नरेंद्र दाभोळकर कुटूंबाचे देशासाठी महत्त्वाचे योगदान
बारामती : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या तपासाला उशीर झाला. या हत्या तपासाबाबत कडक भूमिका घ्यायला हवी. दाभोळकर कुटूंबाचे देशासाठी महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या क्रुर हत्येचा प्रत्येकानेच निषेध केला. अशी कृती पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने लक्ष ठेवले पाहिजे. तसेच जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती येथे रविवारी (दि. २०) एका कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत. विरोधकांकडे काही बोलायला नसल्याने ते खोटे-नाटे आरोप करत आहेत. सध्या देशासमोर महागाईचे खुप मोठे आव्हान आहे. रोजच्या दैनंदिन आयुष्यातील गरजेच्या वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने महागाई कशी कमी करावी, यावर लक्ष दिले पाहिजे. संसदेमध्ये मी राईट टू डिसकनेक्ट बील आणले आहे. यामध्ये कामाच्या वेळेनंतर स्वत:साठी कुटूंबासाठी वेळ वैयक्तिक वेळ असणे गरजेचे असते. तिथे कामासंदर्भात कोणी फोन करू नये. अर्थात गरजेच्या वेळी असे फोन करता येतील. मात्र उगिचच त्या कामगाराला त्रास देऊ नये. खासगी आयुष्य आणि काम नोकरी याची मोठ्याप्रमाणात सध्या गल्लत होत आहे. त्यामुळे कुटूंबाला, स्वत:ला वेळ देता येत नाही. त्यामुळे कामातून पूर्णपणे डिसकनेक्ट होऊन आपल्या कुटूंबाला आणि स्वत:ला वेळ देता यावा यासाठी हे बील मी आणले आहे, अशी माहिती यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.