मोशीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत डांबून ठेवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 02:48 PM2019-01-03T14:48:29+5:302019-01-03T14:51:58+5:30
हाताने तसेच काठीने त्याच्या पाठीवर मारले, एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतरसुद्धा शंकरला थांबवले. त्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवले.
पिंपरी : आपल्या गैरहजेरीत नक्कल करतो, आपल्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कमेंट करतो, असा गैरसमज झालेल्या शिक्षकाने अल्पवयीन मुलाला हात व काठीने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडीच्या नुतन महापालिका प्रशाळेत बुधवारी घडली. मारहाण करुन समाधान न झाल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवण्याची शिक्षा दिली. शिक्षकाच्या या कृतीबद्दल संतापलेल्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी येथील महापालिका शाळेत शिकणाऱ्या शंकर नावाच्या मुलाबाबत ही घटना घडली. आठवीतील शंकरचे हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत सर यांनी त्याला अघोरी प्रकारची शिक्षा दिली. शंकर हा मुलांमध्ये आपली नक्कल करून दाखवतो. आपल्याविषयी कमेंट करतो. असा त्यांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने शंकरला अघोरी शिक्षा दिली. हाताने तसेच काठीने त्याच्या पाठीवर मारले, एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतरसुद्धा शंकरला थांबवले. त्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवले. बबिता महादेव खोचरे यांनी शिक्षकाविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.