साक्षीच्या मदतीला विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:48 PM2018-07-05T19:48:22+5:302018-07-05T20:32:59+5:30
ती इतरांपेक्षा ‘‘वेगळी’’ या चष्म्यातूनच तिच्याकडे पाहण्याची सवय जडलेल्या समाजातील विविध घटकांकडून तिच्या पदरी निराशा आली.
पुणे : ज्याच्यासाठी लिंगपरिवर्तंन केले त्याने मात्र लग्नानंतर काही दिवसांतच आपले खरे रुप दाखवले. सुरुवातीला प्रेमाच्या आणाभाका घेवून सोबत संसाराची स्वप्ने दाखविले. पुढे विश्वासघात करुन दुसरे लग्न केले. यात एकट्या पडलेल्या साक्षीच्या मदतीला कुणीच आले नाही. ती इतरांपेक्षा ‘‘वेगळी’’ या चष्म्यातूनच तिच्याकडे पाहण्याची सवय जडलेल्या समाजातील विविध घटकांकडून तिच्या पदरी निराशा आली. आता साक्षीच्या मदतीसाठी शहरातील विविध विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी धावून आल्याने तिला यानिमित्ताने आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात लढण्याचे बळ मिळाले आहे.
पूर्वी पुरुष असलेल्या साक्षीचे विठ्ठल माणिक खत्री यांच्या सोबत २०१० पासून प्रेमसंबंध होते. या नात्याचे रुपांतर पुढे लग्नात झाले. त्याकरिता साक्षी खत्री यांनी २०१६ मध्ये शस्त्रक्रिया करुन लिंगपरिवर्तन करुन वैदिक पध्दतीने लग्न केले. यानंतर साक्षीला फसवून विठ्ठल खत्री यांच्या घरच्यांनी त्याचे लग्न राजस्थान येथील एका मुलीशी लावून देण्यात आले. यासंदर्भात न्याय मागण्याकरिता सातत्याने स्थानिक पोलीस प्रशासनाकडे गेले असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याची खंत साक्षी यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात प्रशासकीय पातळीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून पोलिसांच्या चुकीच्या आणि बेकायदेशीर वागणूकी विरोधात अँड. असीम सरोदे यांंच्याव्दारे कायदेशीर नोटीस पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशनला पाठविण्यात आली आहे. तसेच पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आल्याचे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत साक्षी यांनी सांगितले. अन्यायाविरोधात साक्षी यांनी अँड. सरोदे यांची भेट घेवून कायदेशीर लढाई सुरु केली आहे.
* राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करणार
आपल्या जोडीदाराकरिता लिंगपरिवर्तन करुन त्याच्याशी विवाह केलेल्या साक्षी यांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे विधी महाविद्यालयातील काजल मांडगे, पूर्वा कदम, निखिल जोगळेकर, प्रतीक्षा वाघमारे, वैष्णव इंगोले, अंकिता पुलकंठवार, अँड. स्नेहा सकटे यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या वागणूकी विरोधात अँड, सरोदे यांच्याकडून कायदेशीर नोटीस बारामती पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आली होती. परंतु त्यांच्याकडून कुठल्याही पध्दतीची दखल घेण्यात आली नसल्याचे आयएलएस विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थी बोधी रामटेके यांनी सांगितले.
* सर्वात प्रथम ‘‘लोकमत’’ ने घेतली दखल
न्यायाकरिता पोलीस प्रशासन आणि माध्यमे यांचे दार सातत्याने ठोठावणा-या साक्षी यांच्या वृत्ताची दखल सर्वात प्रथम लोकमत वृत्तपत्राने घेतली. त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यात आली. तक्रार नोंदविण्याकरिता गेलेल्या साक्षी यांना सातत्याने निराशेला सामोरे जावे लागले. वृत्तपत्रातील प्रसिध्दीनंतर मात्र बारामती पोलीसांकडून दखल घेण्यात आली होती.