वेल्हे तालुक्यातील विद्यार्थी वाऱ्यावर, अनेक शिक्षक रजेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:12 AM2019-04-01T00:12:16+5:302019-04-01T00:12:35+5:30
अनेक शिक्षक रजेवर : तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीत वास्तव उघड
मार्गासनी : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया हा प्राथमिक शाळेत असतो. या काळात विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम हे शिक्षक करत असतात; मात्र जिल्ह्यातील दुर्गम असलेल्या वेल्हे तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य टांगणीला लागले आहे. तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षक केवळ साध्या अर्जावर तीन तीन दिवस शाळेला दांडी मारत असल्याचा प्रकार तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या पाहणीत उघडकीस आला आहे. याबाबत शिक्षणाधिकाºयांना अहवाल देऊनही त्यांच्यावर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, या काळात गुरुजीविना शाळा असेच चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.
वेल्हे तालुका अतिशय दुर्गम आणि डोंगरी असून, येथील विद्यार्थी पूर्णपणे जिल्हा परिषद शाळांवर अवलंबून आहेत; मात्र दांडीबहाद्दर शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. शिक्षकांना मोठे पगार असूनदेखील हे शिक्षक शाळांवर लक्ष न देता आपल्या वरिष्ठांच्या मर्जीने वावरताना दिसत आहेत. शाळेच्या वेळात येथील शिक्षक पानशेत, वेल्हे, तोरणा, राजगड परिसरात फिरताना दिसत आहेत, तर काही शाळांवरील शिक्षक चार-पाच दिवस सलग येत नाहीत; तसेच काही शाळा तर पाच-सहा दिवस बंदच असतात. असे असतानाही पगार मात्र वेळेवर शिक्षकांना दिला जातोय. विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आदींच्या भेटीगाटी आॅनलाइनची कामे करणे, माहिती भरणे आदी कामांच्या नावाखाली शाळेच्या वेळेत कामचुकार शिक्षक इतरत्र फिरताना दिसत आहेत.
शिक्षक एकमेकांत कुरघोड्या व राजकारण करताना दिसत आहेत. शिक्षक संघटनेच्या एका कार्यक्रमात उद्घाटन कोनशिलेवर नाव नसल्याच्या कारणावरून मोठा वाद-विवाद झाला होता हा वाद-विवाद एवढा विकोपाला गेला की, वेल्हे पोलिसांकडून येथील शिक्षकांना १४९च्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या. लोकसभा निवडणुकीचा तयारीचा भाग म्हणून मतदान केंद्राची पाहणी करताना वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी पानशेत परिसरातील शाळांना भेटी दिल्या होत्या. यामध्ये दापसरे येथील शाळेत फक्त चार विद्यार्थी आहेत. मात्र, या दिवशी एकही विद्यार्थी शाळेत हजर नव्हता, साळवे शिक्षक हजर होते तर बबन खामकर शिक्षक गैरहजर असल्याचे दिसले. तर कोशीमघर शाळेत अतिशय गंभीर परिस्थिती पाहायवयास मिळाली. मुख्याध्यापक शहाजी सोपान पोकळे १४ मार्चपासून हजेरी पटावर स्वाक्षरीच केली नसल्याचे समोर आले. यावेळी येथील शिक्षक लडकत म्हणाले की, मुख्याध्यापक पोकळे सर हे १४ व १५ मार्च रोजी प्रशिक्षणासाठी गेले होते. मात्र, १६ मार्चपासून पोकळे विनापरवाना गैरहजर असल्याचे समोर आले आहे. तसेच, टेकपोळे शाळेत एकच विद्यार्थी असून येथील शिक्षक श्रीकांत सुकरेवार गैरहजर होते. तर टेकपोळे शाळा बंदच होती. तर यापूर्वीही दिवाळी दरम्यान गटविकास अधिकारी मनोज जाधव यांनी वाजेघर, राजगड परिसरात शाळांत भेटी दिल्या असता त्यावेळी देखील अनेक शिक्षक गैरहजर होते. याबाबत जिल्हाशिक्षणाधिकारी कुºहाडे यांच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
दिनांक ३० मार्च रोजी गटविकासअधिकारी मनोज जाधव यांनी वेल्हे तालुक्यातील बारा गाव मावळ परिसरातील शाळांना भेट देऊन शाळांच्या तपासण्या केल्या. यात हारपुड शाळेतील शिक्षक एस.डी.रेंगडे यांनी २७ मार्च ते २९ मार्चपर्यंत तीन दिवसांचा किरकोळ रजेचा फक्त रजेच्या अर्ज ठेवून गेले होते. त्यावर केंद्रप्रमुखांची शिफारस नव्हती व रजेचा अर्ज शाळेतच ठेवून ही बाब गंभीर व दिशाभूल करणारी आहे.
कोळंबी येथील राजू शिवाजी भोंग हे शाळेवर गैरहजर होते व त्यासंबंधित कोणताही अर्ज व माहिती शिक्षण विभागाकडे नव्हती. वरोती येथील जि.प.शाळेतील हरिप्रसाद सवणे हे २६ मार्च पासून शाळेत गैरहजर होते, या भेटीमध्ये आढळलेल्या बाबी या गंभीर स्वरूपाच्या असून संबंधित शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत सर्व स्तरावर होत आहे.
संबंधित शिक्षकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. खुलासा आल्यानंतर त्यांच्या रजा या विनावेतन करणार आहे.
- संजय तांबे, गटशिक्षणाधिकारी वेल्हे.