पुणे : प्रत्येकाला माेठ्या, महागड्या गाडीमधून फिरण्याची इच्छा असते. खासकरुन विद्यार्थ्यांना या गाड्यांची माेठी क्रेझ असते. एकदा तरी या गाडीतून फिरायची त्यांची इच्छा असते. हीच विद्यार्थ्यांची इच्छा अाता पूर्ण हाेणार अाहे. लाईफस्कूल फाऊंडेशनच्या किप मुव्हींग मुव्हमेंट उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मागील वर्षीच्या त्याच शाळेतील सर्वाेत्तम गुणांचा विक्रम माेडणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांसमवेत नव्या काेऱ्या मर्सिडीज बेंझमधून पुण्याची सफर घडविण्यात येणार अाहे. रविवारी 12 अाॅगस्ट राेजी सकाळी 10 वाजता मुंबई-बॅंगलाेर हायवेवरील बी.यु. भंडारी शाेरुमपासून या सफरीला सुरुवात हाेणार अाहे. याबाबतची माहिती लाईफस्कूल फाऊंडेशनचे संचालक नरेन गाेईदानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डाॅ. नवनीत मानधनी, कुलदीप रुंचदानी उपस्थित हाेते. पुणे शहरातील सर्व महापालिकेच्या शाळेतील सर्वाेत्तम 40 मुलांची निवड यासाठी करण्यात अाली अाहे. प्रत्येक विद्यार्थी अाणि त्याच्या पालकांकरिता एक गाडी याप्रमाणे 40 गाड्या एकाच वेळी रस्त्यावर धावणार अाहेत. तब्बल 2 तास या गाडीतून फिरण्याचा अानंद विद्यार्थी घेणार अाहेत. यापूर्वी 2013 मध्ये असा उपक्रम राबविण्यात अाला हाेता. याविषयी अाधिक महिती देताना, नरेन गाेईदानी म्हणाले, पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना केवळ शिक्षणच मिळते. त्यांना अायुष्य जगण्याच्या दृष्टीने पुरेसे मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे बरेचदा पुढे काय करायचे, सार्वजनिक जीवनात कसे वागायचे, काेणत्याही गाेष्टीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकाेन कसा विकसित कारायचा, असे अनेक प्रश्न निर्माण हाेतात, या प्रश्नांती उत्तरे लाईफस्कूल फाऊंडेशनच्या किप मुव्हींग मुव्हमेंट या उपक्रमांतर्गत देण्यात येतात.