पुणे - भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी विश्वास नांगरे पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'मी अंधश्रध्दाळू आहे, गणपती बाप्पा आपत्य देतो या केलेल्या वक्तव्यावरून त्यांनी समाजात अंधश्रध्दा पसरविण्याचे काम केले आहे, तसेच गणपती बाप्पा आपत्य देतो हे वक्तव्य म्हणजे भिडे गुरूजींची पुनरावृत्ती आहे, असे तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरन म्हटले आहे.
तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुकवरुन व्हिडीओ शेअर करत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस निरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केलं आहे. नांगरे पाटील यांचे, गणपती बाप्पा धन देतो, ज्यांना हवं त्यांना आपत्य देतो, हे विधान म्हणजे भिडेंची पुनरावृत्ती आहे. तसेच नांगरे पाटील यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असे विधान करुन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केल्याचे देसाई यांनी म्हटले.गणपती बाप्पांवर आमची श्रद्धा आहे. आम्हीही गणपती बाप्पांचे भक्त आहोत. पण, आम्ही अंध अजिबातच नाही. पोलीस अधिकारी म्हणून शपथ घेताना भारतीय राज्यघटनेच्या वैज्ञानिक दृष्टीकोन या मूल्याला तिलांजली वाहण्याचं काम नांगरे पाटील यांनी केलं आहे. सातारा जिल्ह्यात डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी आपली अंधश्रद्दा निर्मूलन चळवळ उभारली. मात्र, या साताऱ्यातच विश्वास नांगरे पाटील यांनी असे अंधश्रद्धाळू वक्तव्य करत डॉ. दाभोळकरांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी संभाजी भिडे गुरुजींप्रमाणेच नांगरे पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.
दरम्यान, गणपती बाप्पा प्रसन्न होतो, याची मला खात्री आहे. सिध्दीविनायक मंदीरातूनच प्रिलिमरी, मेन, इंटरव्हू आणि कुठल्या राज्यात पोस्टींग होणार, यासंबंधीचे फोन केलेले आहेत. इतका मी गणपती बाप्पाचा भक्त आहे. गणपती प्रसन्न होतो आणि ज्याला पाहिजे त्याला आपत्य देतो, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटल होते.