उपनगरांतील उद्याने अद्यापही बंदच; काहींची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:08+5:302021-01-13T04:22:08+5:30

हडपसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगर आणि परिसरातील उद्याने अद्यापही बंद आहेत. मात्र, उपनगरांतील काही उद्याने नागरिकांना वापरासाठी खुली ...

Suburban parks are still closed; The plight of some | उपनगरांतील उद्याने अद्यापही बंदच; काहींची दुर्दशा

उपनगरांतील उद्याने अद्यापही बंदच; काहींची दुर्दशा

Next

हडपसर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर, उपनगर आणि परिसरातील उद्याने अद्यापही बंद आहेत. मात्र, उपनगरांतील काही उद्याने नागरिकांना वापरासाठी खुली केली आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी उद्यानांची दुर्दशा झाली आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानांमधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मागिल नऊ-दहा महिन्यांपासून उद्याने बंद अवस्थेत होती. लॉकडाऊन शिथिलीकरण आणि अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. आता उद्यानेही नागरिकांना व्यायामासाठी खुली करावीत, असा सूर नागरिकांमधून उमटत आहे. ज्येष्ठ नागरिकांना मागील अनेक महिन्यांपासून घरामध्ये कोंडून ठेवल्यासारखे झाले आहे. त्यामुळे भल्या सकाळी आणि सायंकाळी विरंगुळा म्हणून उद्याने उघडी असणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. उद्याने खुली नसल्यामुळे व्यायाम करायचा तरी कुठे, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

उपनगर आणि परिसरातील उद्यानांमध्ये ओपन जिम सुरू केली आहे. मात्र, ती मागील अनेक महिन्यांपासून उद्यानेच बंद असल्याने जिमचे साहित्यही वापराविना पडून आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक साहित्यांना गंज चढला आहे. पालिका प्रशासनाने उद्यानाची स्वच्छता करून जिमची देखभाल दुरुस्ती करावी. तसेच, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करून पुन्हा पाणी भरावे, असा सल्ला ज्येष्ठ नागरिकांनी दिला आहे.

दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करावी

हडपसर (गोंधळेनगर)मधील हेमंत करकरे उद्यानामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी नागरिक वॉकिंगसाठी येतात. या उद्यानाची स्वच्छता केली जात नसल्यामुळे पालापाचोळा मोठ्या प्रमाणात साचला आहे. स्वच्छतागृहामध्ये पाणी नाही, नळ तुटले आहेत, वॉशबेसिनचा आरसा फुटला आहे. मागील आठवड्यात पाऊस झाल्यामुळे चिखल झाला असल्याने वॉकिंग ट्रॅक निसरडा झाला आहे. उद्यान विभागाच्या प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करावी. तसेच परिसरातील बंद अवस्थेत असलेली सर्व उद्याने नागरिकांसाठी खुली करावीत, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे

उद्यानासमोर कारले, गव्हांकूर, आवळा, लिंबू आदी ज्यूस विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण कोरोनामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. त्यात पुन्हा अशा काही ज्यूसमुळे कोणता आजार जडू नये, यासाठी नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

फोटो : उपनगर आणि परिसरातील उद्याने अद्यापही बंद आहेत. तर काही उद्याने खुली केली आहेत. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी उद्यानांची दुर्दशा झाली आहे. स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.

Web Title: Suburban parks are still closed; The plight of some

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.