राजकीय हेवेदावे बाजूला ठेवल्याने कामाला यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:14 AM2021-08-22T04:14:11+5:302021-08-22T04:14:11+5:30
--- खेड-शिवापूर : राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न केल्यामुळेच शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांच्या पाण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन आणि गुंजवणी ...
---
खेड-शिवापूर : राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न केल्यामुळेच शिवगंगा खोऱ्यातील नागरिकांच्या पाण्यासाठी पुरंदर उपसा सिंचन आणि गुंजवणी धरणाचे पाणी आणण्याचे स्वप्न आता पूर्ण होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
शिवगंगा खोऱ्यामध्ये उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणास शासकीय मंजुरी मिळाल्यामुळे त्याच्या सर्वेक्षणाच्या कामाचा शुभारंभ खेड-शिवापूर येथे शिवभूमी विद्यालयामध्ये पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार भीमराव तापकीर, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, सहसंपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, माजी जि. प. उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे, मा. जि. प. सदस्य नवनाथ पारगे, आबा लांडगे, नगरसेवक सचिन दोडके, भोरचे मा. उपसभापती अमोल पांगारे, त्र्यंबक मोकाशी, भोर तालुका प्रमुख माऊली शिंदे, गुंजवणी संघर्ष समिती अध्यक्ष दिनकर धरपाळे, नितीन वाघ, शैलेश सोनवणे, बाळासाहेब गरुड, भाजपाचे जीवन कोंडे, बुवा खाटपे, आदित्य बोरगे, सरपंच अमोल कोंडे, अजित कोंडे, राकेश गाडे, वेळूचे सरपंच अप्पा धनवडे युवा सेनेेचे सचिन पासलकर, आदित्य बांडे हवालदार, अशोक वाडकर, जितेंद्र कोंडे आदी उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले की, शिवगंगा खोऱ्यातील, तसेच भोर-वेल्हा तालुक्यातील नागरिकांची शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची योजना पुरंदर उपसा योजनेबरोबरच गुंजवणी धरणातून व्हावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, शासनाकडून याला मंजुरी मिळत नव्हती. यासाठी भोर, वेल्हा परिसरातील सर्व पक्षीय नेते मंडळींनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून गुंजवणी संघर्ष समिती नावाने समिती स्थापून कायदेशीर सनदशीर मार्गाने संघर्ष उभा केला. विकासाच्या मुद्द्यावर जर सर्वजण एकत्र झाले, त्यामुळे अशक्यप्राय गोष्टही शक्य झाली याचेच हे उदाहरण आहे.
शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे असे म्हणाले की, यापुढेही भागाच्या विकासासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन काम करावे. संघर्ष समितीच्या माध्यमातून या भागाच्या विकासासाठी एकजुटीने काम करत राहूयात तर विकास सहज साध्य होणार आहे.
--
चौकट
महिनाभरात होणार सर्वेक्षण
येत्या महिनाभरात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल आणि लवकरच शिवगंगा खोऱ्यात गुंजवणीचे पाणी येईल अशी ग्वाही या वेळी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर ड्रोन उडवून सर्वेक्षणाच्या कामाला शुभारंभ करण्यात आला. त्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या कामाचा आनंद व्यक्त केला.
--
फोटो क्रमांक : २१ खेड-शिवापूर गुंजवणी पाणी
फोटो ओळी : गुंजवणी पाणीपुरवठा योजना