देहूरोड येथील लोहमार्ग महामार्गावरील उड्डाणपूलावरुन ऊसाचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 06:54 PM2018-03-30T18:54:35+5:302018-03-31T13:54:10+5:30
मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलावरुन ऊस वाहतुक करणारा ट्रॅक्टर दोन्ही ट्रॉलीसह कोसळला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला
देहूरोड: मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर देहूरोड येथील लोहमार्ग उड्डाणपूलाच्या उताराच्या रस्त्याने देहू येथून मावळातील दारुंब्रे येथील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका बाजूचा टायर फुटल्याने दोन्ही ट्रॉलीसह पुलाचे कठडे तोडून खाली कोसळला. शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला असून अपघातात ट्रॅक्टरचा चालक जखमी झाला असून देहूरोड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संतोष पवार ( वय ४० ) हल्ली रा संत तुकाराम सहकारी साखर कारखाना , दारुंब्रे , मूळ गाव-चाळीसगाव ) असे अपघातात जखमी झालेल्या चालकांचे नाव आहे. देहू परिसरातील काळोखेमळा येथून वैशाली मोहन काळोखे यांच्या शेतातील ऊस घेऊन संबंधित ट्रॅक्टर (आरटीओ क्रमांक नसलेला ) , ट्रॉली ( क्रमांक टीटी-२७) तसेच आणखी एक लोखंडी ट्रॉली ( क्रमांक नसलेली ) अशा दोन ट्रॉलीसह पुणे मुंबई महामार्गाने जात असताना देहूरोड येथील लोहमार्गाच्या उड्डाणपुलाच्या उतारावरून कारखान्याच्या दिशेने जात असताना ट्रॅक्टरचा उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला त्यामुळे चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने पुलाच्या लोखंडी कठड्यास धडकून पुलावरून दोन्ही ट्रॉलींसह डाव्या बाजूला सुमारे वीस फूट खाली कोसळला. दोन ट्रॉलीत सुमारे दहा टन ऊस होता. अपघाताचा आवाज ऐकून विकासनगर रस्त्यावरील रिक्षा थांब्यावरील कुणाल वाल्मिकीसह काही रिक्षा चालकांनी अपघातस्थळी धाव घेतली. जखमी चालकास बाहेर काढले. दरम्यान, देहूरोड परिसरातील काही नागरिकांनी अपघातातील दोन ट्रॉलीमधून बहुतांशी ऊस पळवून नेला. अपघातानंतर महामार्गावर दुतर्फा मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. देहूरोड पोलिसांनी अपघातस्थळी आल्यानंतर तातडीने वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, देहूरोड येथील आयुध निर्माणीसमोर भुयारी मार्गाचे काम सुरु असल्याने पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सायंकाळी साडेसहापर्यंत संथगतीने वाहतूक सुरु होती.