स्वातंत्र्यलढ्याबाबत सुमित्रा महाजन अज्ञानी, काँग्रेसची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:57 AM2018-07-10T02:57:52+5:302018-07-10T02:58:06+5:30
लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ज्या पक्षाच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्यामुळेच चले जाव चळवळीसंदर्भात त्या अज्ञानी आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे.
पुणे - लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन ज्या पक्षाच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कधीही सहभाग घेतला नाही, त्यामुळेच चले जाव चळवळीसंदर्भात त्या अज्ञानी आहेत, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी देशाला स्वातंत्र्य चले जाव चळवळीमुळे मिळाले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यावर टीका करण्यात येत आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी त्याचा समाचार घेतला. महाजन यांनी अज्ञानातून तसे वक्तव्य केले. सन १८५७ मध्ये सुरू झालेला स्वातंत्र्यलढा सन १९४७ मध्ये संपला. सन १९४२ ची महात्मा गांधी यांनी सुरू केलेली चले जाव चळवळ हे त्यातले सुवर्णपान आहे. महाजन यांच्या भाजपाची मातृसंघटना असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगळता संपूर्ण देश या चळवळीत सहभागी झाला होता व त्याला घाबरूनच इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. इतिहास असा असताना आता महाजन चले जाव चळवळीला कमी लेखत आहे, हे त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासंबधी असलेल्या अज्ञानाचेच द्योतक आहे, अशी टीका बागवे यांनी केली. महात्मा गांधी यांनी सुरू केलेली ही चळवळ भारतालाच नाही तर पारतंत्र्यात असलेल्या जगातील अनेक देशांना प्रेरणादायी ठरली. नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग ही त्याचीच उदाहरणे आहेत. महाजन यांनी हे सर्व माहीत करून घ्यावे व नंतरच स्वातंत्रलढ्याबाबत बोलावे, पुण्यात बोललात तसे आता अन्य ठिकाणी तरी बोलू नये, असे आवाहन केले.