नाझरे जलाशयातून उन्हाळी हंगाम पाहिले आवर्तन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:59+5:302021-03-25T04:10:59+5:30
प्रचंड ऊन आणि उन्हाळा सुरू झाल्याने या पट्ट्यातील शेती पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उसाची पिके ...
प्रचंड ऊन आणि उन्हाळा सुरू झाल्याने या पट्ट्यातील शेती पिके पाण्याअभावी जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. उसाची पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत तर अनेक ऊस उत्पादकांना पाण्याअभावी उसाच्या उत्पन्नावरही परिणाम दिसू लागला आहे. पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने कडवळ आणि नगदी पिके ही धोक्यात आली आहेत. एकीकडे उन्हाळा, दुसरीकडे वीज महावितरणकडून सुरू झालेली वीजबिलांची सक्तीची वसुली यामुळे त्रस्त झालेले शेतकरी पाणी असूनही काहीच करू शकत नाहीत. धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप चिकणे, नाझरेचे शेतकरी देविदास नाझीरकर, बारीकराव नाझीरकर, सदाशिव चिकणे, नितीन नाझीरकर, जवळार्जुनचे मामा गुळूमकर तसेच पट्ट्यातील शेतकऱ्यांनी नाझरे जलाशयाचे शाखाधिकारी अनिल घोडके यांची भेट घेतली. शेतकरी व नाझरे प्रकल्प यांच्यात समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर उपाय म्हणजे ताबडतोब जलाशयातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीनुसार आज पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे आवर्तन सोडण्यात आले.
नाझरे प्रकल्प हा या परिसरातील शेतीसिंचन आणि पाणीपुरवठा योजनांसाठी आहे. जलाशयातून येथील सर्वच पाणीपुरवठा योजनांना पाणी दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांची पिके जळू लागली तरी ही पाण्याचे नियोजन जलाशयाच्या प्रशासनाकडून झालेले नव्हते. जलाशयाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून शेतीला पाणीपुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांनी ही स्वतः प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाण्याची मागणी करावी, असे आवाहन टेकवडे यांनी यावेळी केले आहे.
जलाशयाच्या कालव्यातून ३० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असून टेल टू हेड अशा पद्धतीने पाणीवाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे जलाशयाचे शाखाधिकारी अनिल घोडके यांनी सांगितले. सध्या जलाशयात ४०२ दशलक्ष घनफूट म्हणजेच ७१ टक्के पाणीसाठा आहे. जलाशयावरील पिण्याच्या पाण्याच्या सर्वच्या सर्व योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहितीही या वेळी देण्यात आली.
नाझरे जलाशयातून कालव्याद्वारे शेती सिंचनासाठी आवर्तन सोडताना माजी आ. अशोक टेकवडे, शाखा अभियंता अनिल घोडके, संदीप चिकणे व इतर.