पुणे : शासकीय सुटीचा दिवस असलेल्या रविवारी बहुतांश मतदार घरी भेटणार, हे निश्चित असल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांनी मतदारांची घरोघर जाऊन भेटी देण्यावर विशेष भर दिला. भेटीगाठींबरोबर सोसायट्यांच्या बैठका, हळदी-कुंकू समारंभ, स्नेहभोजन आदी अनेक कार्यक्रमांचे प्रभागांमध्ये आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडीची, तर भाजपा व शिवसेनेत युतीची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे पहिली उमेदवार यादी जाहीर होण्यासाठी आणखी ४ ते ५ दिवस लागण्याची शक्यता आहे. उमेदवार यादीमध्ये जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांचा अधिकृत प्रचार सुरू होईल. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या प्रचारसभांचाही धडाका सुरू होईल. मात्र उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर प्रचार करण्यास खुपच कमी वेळ हातात असणार आहे. त्यानंतर घरोघर जाऊन भेटी घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच प्रत्यक्ष भेटीगाठींवर भर दिला जात आहे. घरातील बहुतांश सदस्य रविवारी घरी भेटतात, त्यामुळे रविवारी घरोघर भेटी, मित्रमंडळी, सोसायटींच्या बैठका यावर इच्छुकांनी लक्ष केंद्रित केले आहे. रविवारचा मुहूर्त साधून अनेक ठिकाणी महिला इच्छुक उमेदवारांनी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचबरोबर काही इच्छुक उमेदवारांच्या घरी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. भाजपाने सर्व इच्छुक उमेदवारांनी एकत्रित प्रचार करावा, असे आवाहन केले आहे, त्यानुसार काही प्रभागांमध्ये भाजपाचे इच्छुक उमेदवार एकत्रित प्रचार करताना दिसून आले.चारसदस्यीय प्रभाग झाल्याने जुन्या प्रभागाला बराचसा नवीन भाग जोडला गेला आहे. तिथल्या भागांवर इच्छुकांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्या भागातील नातीगोती, मित्रमंडळी यांना सोबत घेऊन मतदारांच्या ओळखी करून घेतल्या जात आहेत. प्रत्येकाच्या घरी चहा पिण्याचा होत आग्रह इच्छुकांना केला जात होता, त्यामुळे अनेक चहाचे कप रिचवित प्रचार करण्यावर उमेदवारांनी भर दिला.शिवसेना-भाजपा युतीची पुढच्या चर्चेसाठी दोन दिवसांनी भेटायचे निश्चित झाले आहे. मुंबईतील युती होणार की नाही, यावर पुण्यातील युतीचे भवितव्य अवलंबून आहे. मुंबईत शिवसेनेने भाजपासोबत सन्मानपूर्वक युती केली तर भाजपाकडून पुण्यात शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
इच्छुकांसाठी रविवार धावपळीचा
By admin | Published: January 23, 2017 3:29 AM