सुपे पोलिसांची गुटखा माफियावर कारवाई; एका वाहनासह ३१ लाखाचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:46 AM2024-03-25T08:46:32+5:302024-03-25T08:47:23+5:30
बारामती तालुक्यातील औद्योगिक वसाहत एमआयडीसी हद्दीत एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी ठेवला जातो...
सुपे (पुणे) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैद्यरित्या सुरु असलेल्या विक्रीवर पोलिसांनी छापा टाकून एका वाहनासह सुमारे ३१ लाखाचा गुटखा जप्त केला. ही घटना शनिवारी ( दि. २३ ) उंडवडी सुपे येथील विद्युत सबस्टेशन नजिकच्या एका फार्म हाऊसवर घडली. यामध्ये एका गुटखा माफियास अटक करण्यात आली आहे. सुपे पोलिस स्टेशनंतर्गत ही पहिलीच सर्वात मोठी कारवाई झाली आहे. प्रशांत धनपाल गांधी ( वय ४८ रा. लासुर्णे ता. इंदापुर सध्या रा. ऋषिकेश अपार्टमेंट प्लॅट नं १ पेन्शील चौक बारामती) असे अटक केलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील औद्योगिक वसाहत एमआयडीसी हद्दीत एका गोडाऊनमध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी ठेवला जातो. तसेच तो जिल्ह्यातील विविध भागात पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार प्रशांत यांच्या घराची झडती घेतली असता मुद्देमाल मिळून आला नाही. त्यानंतर कसून चौकशी केली असता कर्नाटकमधील विजापुर येथील निसार ( पुर्ण नाव माहिती नाही ) यांच्याकडून विक्रीसाठी आणलेला गुटखा यवत येथील राहुल मलबारी यास देण्याकरीता जात असताना वाहन रस्त्यात नादुरुस्त होऊन बंद पडले. त्यामुळे उंडवडी येथील स्वमालकीच्या फार्म हाऊसवर गुटखा ठेवल्याची माहिती गांधी याने दिली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकल्यावर एका पिकअप वाहनासह ३१ लाख किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
दरम्यान आरोपी प्रशांत, निसार आणि राहुल मलबारी आदी गुटखा माफियावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. तर प्रशांत यास ताब्यात घेऊन रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यास बुधवार ( दि. २७ ) पर्यंत पोलिस कस्टडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आज करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते.