पुणे : माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी कवी वरावरा राव आणि अँड. सुरेंद्र गडलिंग यांनी सीपीआय (माओवादी) संघटनेतील भूमिगत सदस्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलावर विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले. याशिवाय रोना विल्सन आणि अँड. गडलिंग यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या डेटामधून देशाचे स्थैर्य धोक्यात आणण्याच्या दृष्टीने व सामाजिक स्वास्थ्य बिघडून युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्याचे निर्णय सीपीआयच्या ईस्टर्न रिजनल ब्युरोच्या बैठकीत झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी उजेडात आणली आहे. एल्गार परिषदेच्या खटल्यामध्ये पुणे पोलिसांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) माजी जनरल सेक्रेटरी गणपती आणि वरवरा राव यांच्यासह पाच जणांविरोधात एक हजार ८३७ पानांचे पुरवणी आरोपपत्र सादर केले.
विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. देशविरोधी कारवाया करण्यासाठी लागणारे शस्त्रास्त्रे व दारूगोळा खरेदी करण्यासाठी मदत करणारा बसंता हा नेपाळमधील माओवादी संघटनेचा वरिष्ठ नेता आहे. तो राव यांच्या संपर्कात होता. आरोपी सीपीआयचा महासचिव मुपल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती ऊर्फ जी. एस. ऊर्फ कॉ. जी. याच्या संपर्कात राहून संघटनेची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता. तर राव हे सीपीआयसाठी निधी उभारणे व वितरणाचे काम करीत आहे, असे दोषारोपपत्रात नमूद आहे. वरवरा राव यांच्यासह २३ जणांवर देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.आरोपींवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमानुसार खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. माओवादी एजीएमसी, कबीर कला मंच, पीपीएससी अशा फ्रंट आॅर्गनायझेशन्सच्या मदतीने गुप्तरीत्या काम करत असल्याचेही दोषारोपपत्रात नमूद आहे.सीपीआय संघटनेचा सचिव फरारया प्रकरणात दाखल झालेले हे दुसरे दोषारोपपत्र आहे. या पूर्वी सुधीर ढवळे, रोना विल्सन, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, अँड. सुरेंद्र गडलिंग आणि भूमिगत असलेले कॉ. एम. ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे, किशनदा ऊर्फ प्रशांत बोस, प्रकाश ऊर्फ नवीन ऊर्फ रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु आणि कॉ. मंगलु अशा दहा जणांविरोधात १५ नोव्हेंबर २०१८ रोजी ५ हजार १६० पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गणपती हा सीपीआय (माओवादी) या संघटनेचा सचिव असून तो फरार आहे. इतर ४ आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत.