वाहतूक व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे : के. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:23 PM2018-10-09T16:23:33+5:302018-10-09T16:26:29+5:30
‘शहरात वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या आपल्याला नियमित भेडसावत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे ठरत आहे.
पुणे : ‘शहरात वाहतूककोंडी, वायुप्रदूषण या समस्या आपल्याला नियमित भेडसावत आहेत. ही वाहतूक कोंडी फोडून वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांकडून मिळणारे सहकार्य मोलाचे ठरत आहे. त्यामुळे शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहे’, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले.
येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या केजे अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे आयोजित ‘गो सायकल रॅली’चे उद्घाटन डॉ. व्यंकटेशम यांच्या हस्ते झाले. खडीमशीन चौक ते बोपदेव घाटाच्या पायथ्याशी असलेल्या केजे शिक्षण संकुलापर्यंत ही रॅली निघाली. संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, प्राचार्य डॉ. सुहास खोत, डॉ. हरिभाऊ फाकटकर, डॉ. निलेश उके यांच्यासह जवळपास ३०० सायकलस्वार यामध्ये सहभागी झाले. ‘स्वच्छ पुणे ग्रीन पुणे’, ‘माय क्लीन इंडिया’, ‘सायकल वापरा प्रदूषण टाळा’ अशा घोषणा देत प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा नारा या रॅलीतून देण्यात आला.
डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला काही वेळ समाजासाठी द्यायला हवा. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत अनेक विद्यार्थी यामध्ये सहभागी होत असतात. पोलिसांसमोर अनेक समस्या आहेत. वाहतूक व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा चांगला उपयोग होईल. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाने काही ठिकाणे निवडून तेथील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. शक्यतो सायकलींचाच वापर करावा, जेणेकरून रस्त्यावर मोठी वाहने येणार नाहीत आणि वाहतूक कोंडी होणार नाही. शिवाय वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही.’
विद्यार्थी प्रेम मरगजे याने सूत्रसंचालन केले. प्रा. अपर्णा हंबर्डे यांनी आभार मानले.