भोर (पुणे) : भाजपचे एक देश, एक पक्ष धोरण असून विरोधी पक्षाला संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. केंद्राचे माझ्या मतदारसंघावर केंद्राचे अधिक लक्ष असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात येणार असतील तर त्यांचे स्वागत आहे, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. भोर येथील यशवंत लाॅन्स येथे विविध विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी स्नेहा देव, जि.प. माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, युवा नेते विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, मानसिंग धुमाळ, विठ्ठल शिंदे, नितीन धारणे, गणेश खुटवड, विलास वरे, युवराज जेधे, केदार देशपांडे, मनोज खोपडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात आढावा बैठकीच्या आयोजनाची माहिती रणजीत शिवतरे यांनी दिली. सुळे म्हणाल्या की, प्रत्येकाला पक्ष वाढवायची मुभा आहे. त्यात वेगळे काही नाही. यामुळे अर्थमंत्री येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. आघाडी सरकार पाडल्यानंतर मंत्रिमंडळ करायला एक महिना उशीर लावला आहे. पुणे जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे पालकमंत्री लवकर नियुक्त करावेत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी निकृष्ट बांधकामे, भूमी अभिलेख विभागाकडून मोजणीला विलंब, रस्ते खराब झाले आहेत. बालकाचे कुपोषण वाढत आहे, प्राथमिक शाळेत शिक्षक कमी आहेत. एसटी सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामीण गावे अंधारात येतात. भोर नगरपालिकेकडून मंजूर केलेला निधी वापरला जात नाही, बचत गटांचे सक्षमीकरण करावे, अशा मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या.
भोरचा नेकलेस पाॅइंट डेव्हलप करणार
भोर-पुणे रस्त्यावरील खंडोबाचा माळ येथील निरा नदीवर तयार झालेला नेकलेस पाॅइंट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे हा नेकलेस पाॅइंट डेव्हलप करून सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ, तसेच रायरेश्वर रोहिडा तोरणा किल्ला येथेही पर्यटनास विकास करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.