'मी अजुनही ते पुस्तक...'; मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:11 AM2023-10-16T09:11:19+5:302023-10-16T09:13:54+5:30
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे- येरवड्यातील पोलिस ठाण्याच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन मंत्री दादा यांनी घेतला होता, असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर लिखित 'मॅडम कमिशनर' या पुस्तकाच्या 'द मिनिस्टर' या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
माजी पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जमिनीच्या लिलाव करण्याच्या निर्णया संदर्भात आरोप केले. या संदर्भात बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी अजुनही ते पुस्तक वाचलेलं नाही. मला वाटतं यावर बोरवणकरच यावर स्पष्टीकरण देऊ शकतात, आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतंय. ते पुस्तकच मी अजुनही वाचलेलं नाही, त्यामुळे मी यावर काहीही बोलू शकत नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.
शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर 'विनोदी' शब्दात निशाणा
मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात धक्कादायक खुलासे
पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर विभागीय आयुक्तांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, पुण्याच्या पालकमंत्र्यांना एकदा भेटा. येरवडा पोलिस ठाण्याच्या जमिनीसंबंधित विषय आहे. त्यानुसार मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याकडे येरवडा पोलिस ठाणे परिसराचा नकाशा होता. ते म्हणाले की, या जमिनीचा लिलाव झाला आहे. जो जास्त बोली लावेल, त्याच्यासोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी. मी पालकमंत्र्यांना सांगितले की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी जागा मिळणार नाही.
दादां’नी केले आरोपांचे खंडन
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोरवणकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. अशा प्रकारच्या जमिनींचा लिलाव करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना नाहीत. अशी प्रकरणे महसूल विभागाकडे जातात आणि नंतर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेते. रेडिरेकनरनुसार मंत्रिमंडळ जमिनीची किंमत ठरवते. त्यामुळे या प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही, असे अजित पवार म्हणाले.