पिंपरी : स्वरसागर महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात युवा गायक सौरभ साळुंके यांचे बहारदार शास्त्रीय गायन झाले. त्यांनी राग ‘मधुवंती’मधील बंदीश सादर केली. गायक महेश काळे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील, तसेच चित्रपटातील ‘सूर निरागस हो’ या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.महापालिकेतर्फे संभाजीनगर, चिंचवड येथे सुरू असलेल्या महोत्सवात साळुंके यांनी दमदार आणि जोरकस गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर खास आग्रहास्तव ‘सुखाचे जे सुख चंद्रभागेतटी’ हा अभंग सादर केला. त्यांना संवादिनीसाथ अभिजित पाटसकर यांनी, तर तबलासाथ केदार तळणीकर यांनी केले.सध्या रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता सुबोध भावे आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील, तसेच चित्रपटातील आपल्या आश्वासक गायकीने लोकप्रिय झालेला कलाकार महेश काळे यांनी कार्यक्रमाची सुरुवात ‘सूर निरागस हो’ या सध्या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गायनाने केली. त्यानंतर बालगंधर्वांना आदरांजली म्हणून संगीत ‘स्वयंवर’ या नाटकातील बालगंधर्वांनी अजरामर केलेले रूक्मिणीच्या तोंडी असलेले ‘नाथ हा माझा, मोही खला’ हे नाट्यपद सादर केले. त्यांनी या गीताची सुरुवात अप्रकाशित कडव्याने केली. वेळेअभावी चित्रपटातून कापलेल्या या गीताचे हे कडवे सुबोध भावे यांनी रचलेले आहे. त्यानंतर ‘दिलकी तशीप आज है आफताब’ हे गीत सादर केले. महेश यांना संवादिनीसाथ राजीव तांबे यांनी, तबलासाथ विभव खांडोळकर यांनी, व्हायोलिनसाथ रमाकांत परांजपे यांनी, पखवाजसाथ प्रसाद जोशी यांनी, गिटारसाथ मंदार ढुमणे, ढोलकसाथ वैभव केसकर आणि तालवाद्यांची साथ शिरीष जोशी यांनी केली. प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे हा कार्यक्रम रंगतदार झाला. शेवटच्या सत्रात ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण गायकीने रसिकांना स्वरसागरात चिंब भिजवले. त्यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग ‘मारूबिहाग’ने केली. त्यानंतर आपल्या अभ्यासपूर्ण गायकीचा प्रत्यय आणून देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारीे गजल सादर केली. पं. पोहनकर यांनी आपल्या गायनाची सांगता ‘भैरवी’ रागातील ठुमरीने केली. त्यांना या वेळी दमदार व आश्वासक स्वरसाथ युवा गायक सुरंजन खंडाळकर याने केली. संवादिनीसाथ संतोष घंटे यांनी, तबलासाथ प्रशांत पांडव यांनी व तानपुरासाथ शरद सिधये यांनी केली. या वेळी अजय पोहनकर यांनी उपस्थित प्रेक्षकांची वाहवा करताना स्वरसागर महोत्सवाची तुलना पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाशी केली. पहिल्या सत्रात स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम सादर केले. या वेळी सागर उपासनी यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यपद सादर केले. विधी शर्मा व अभिलाषा गजभिये यांनी सतारवादन केले. त्यांनी राग ‘यमनकल्याण’ सादर केले. पायल नृत्यालयाच्या विद्यार्थींनींनी ‘ध्यायेत नित्यम महेशम’ ही शिववंदना, तराणा व फ्युजन नृत्य सादर केले. पायल गोखले यांचे नृत्यदिग्दर्शन व संकल्पना असलेल्या या कार्यक्रमात संगीता शाळीग्राम,अक्षता टिळक, तृप्ती आळतेकर, गायत्री वळवईकर, मानसी भागवत, वैभवी पंडित व स्वप्नाली डुबे यांचा सहभाग होता. निवेदन सरोज राव यांनी केले.(प्रतिनिधी)
सूर निरागस हो...ने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: March 09, 2016 12:33 AM