पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांचे पुत्र शिरीश कुलकर्णी सोमवारी सायंकाळी शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाला शरण आले. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शिरीश कुलकर्णी यांचा जामीन अर्ज फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एका आठवड्यात पोलिसांना शरण जाण्याचे आदेश मंगळवारी दिले होते. एका आठवड्याची मुदत संपत आल्याने शिरीश हे पोलिसांनी शरण आले आहेत. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांच्यासह १९ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी शिरीष यांच्याविरूद्धही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरीश यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सर्वोच्च न्यायालयानेत्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिरीश सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या न्यायालयात हजर झाले. सुनावणी न्यायाधीशांच्या अंतर्गत केबीनमध्ये घेण्यात आली.डीएसके यांनी केलेल्या फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे. ठेवीदारांकडून गोळा केलेले पैसे शिरीश यांच्या बँकखात्यात वळविण्यात आले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांना तपास करायचा आहे, त्यामुळे सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.शिरीश हे २०१६ मध्ये डीएसकेंच्या सर्व कंपन्यांमधून निवृत्त झाले आहेत. ठेवीदारांना जे चेक दिले गेले आहेत. त्यावर शिरीश यांची सही नाही. ते गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यास जबाबदार नाहीत. बँकांनी दिलेल्या कर्जप्रकरणात शिरीश यांचा काही संबंध नाही, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने अॅड. सुशीलकुमार पिसे यांनी केला.
डीएसकेपुत्र न्यायालयाला शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 3:18 AM