लक्ष्मण मोरे / युगंधर ताजणे।
पुणे : महामेट्रोकडून स्वारगेट येथे उभारण्यात येत असलेल्या ‘मल्टी मोडल हब’च्या कामादरम्यान आढळलेल्या भुयाराची शनिवारी सकाळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान केलेल्या नोंदींवरून तसेच बांधकामाचा अभ्यासकरून त्याचा अहवाल येत्या आठवड्याभरात महामेट्रोला दिला जाणार आहे. याबरोबरच महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर या भुयाराचे ‘नेमके’ काय करायचे हे ठरणार आहे.
स्वारगेटला पायलिंग मशीनच्या साहाय्याने खड्डे घेण्याचे काम सुरू असताना जमीन खचल्यानंतर या भुयाराची माहिती समोर आली होती. दगडी बांधकाम केलेल्या दुतर्फा भिंती आणि त्यावर विटांच्या बांधकामाचे कमानीच्या आकाराचे अर्धगोलाकार छत असे हे ५५ मीटर लांबीचे आणि चार फूट रुंदीचे बांधकाम आहे. ‘लोकमत’ने स्वारगेटला भुयार सापडल्याची सविस्तर बातमी दिल्यानंतर या ठिकाणी इतिहास अभ्यासकांसह नागरिकांनी भेट देत पाहणी केली होती. या ठिकाणी आढळून आलेले भुयार हे स्वारगेट जलतरण तलावासाठी कालव्यामधून पाणी आणण्यासाठी केलेली व्यवस्थाअसू शकते, असा अंदाज पहिल्या दिवशी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला होता. मात्र, दगडीतसेच जुन्या धाटणीचे बांधकाम असल्याने हे बांधकाम पुरातत्त्वीयआहे, की अलीकडच्या काळातील याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांच्यासह अधिकाऱ्यांनी शनिवारी या भुयाराला भेट दिली. वहाने यांनी सांगितले, की हे बांधकाम प्राचीन अथवा ऐतिहासिक असल्यासारखे वाटत नाही. हे दगड, विटा आणि सिमेंटचे काम आहे. हे काम पेशवेकालीन नसावे, असा प्राथमिक अंदाज आहे. मेट्रो कंपनीला पुरातत्त्व विभागाकडून व्यवस्थित नियोजनबद्ध आराखडा द्यावा लागणार आहे. त्यांना याबाबत मार्गदर्शनही करावे लागणार आहे. अहवाल आल्यानंतरच याबाबतच चित्र स्पष्ट होणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही वहाने म्हणाले.या ठिकाणी पालिकेचे दोन जलतरण तलाव होते. एक छोटे पंपिंग स्टेशन होते. साधारण १९६८ पर्यंत जलतरण तलाव, पंपिंग स्टेशन याला जोडणारा हा पाण्याचा खंदक (वॉटर चॅनल) असावा, असा अंदाज आहे. मात्र, तरीही या भुयाराबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही.घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून हे भुयार नेमके कशाचे आहे, हे आताच सांगता येणार नाही. प्रथमदर्शनी ते पाण्याकरिता वापरण्यात येणारे भुयार असावे असे दिसते. आम्ही याबाबतचा अहवाल महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाच्या संचालकांना सादर केला जाणार आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याबाबतचा निष्कर्ष अपेक्षित आहे. त्यामधूनच भुयाराबाबतची अधिकृत माहिती समजू शकेल. आताच स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही.- विलास वहाने,सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग, पुणेपुण्यातील स्वारगेट भागात आढळून आलेल्या भुयाराची आमच्या पुण्यातील अधिकाºयांनी पाहणी केली आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतरच भुयाराबाबतची अधिकृत माहिती स्पष्ट होऊ शकेल. त्याविषयी आताच प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही.- डॉ. तेजस गार्गे, संचालक,पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र