पेपर स्कॅनिंगप्रकरणी ‘त्या’ कर्मचाऱ्यासह एकाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2015 03:32 AM2015-12-01T03:32:39+5:302015-12-01T03:32:39+5:30

जिल्हा परिषदेच्याच एका कर्मचाऱ्याने परीक्षा केंद्रावर वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेची फोटोकॉपी काढल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे

Suspension of one with 'that' employee in paper scanning case | पेपर स्कॅनिंगप्रकरणी ‘त्या’ कर्मचाऱ्यासह एकाचे निलंबन

पेपर स्कॅनिंगप्रकरणी ‘त्या’ कर्मचाऱ्यासह एकाचे निलंबन

Next

पुणे : जिल्हा परिषदेच्याच एका कर्मचाऱ्याने परीक्षा केंद्रावर वर्गात जाऊन प्रश्नपत्रिकेची फोटोकॉपी काढल्याने उमेदवारांनी संताप व्यक्त केल्यानंतर ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, त्या कर्मचाऱ्यासह समन्वयकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे़
क्षितिज डोंगरे व संतोष डोंगरे अशी त्या दोघांची नावे आहेत. जिल्हा परिषदेच्या कर्मचारीभरतीच्या विविध पदांसाठी परीक्षा सुरू आहेत. २५ नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू असून १८५ जागांसाठी ३८ हजार ३०४ अर्ज आले होते. २५ व २८ नोव्हेंबर रोजी काही पदांची परीक्षा सुरळीत झाली. रविवारी विस्तार अधिकारी सांख्यिकी व परिचरपदाची परीक्षा होती. विस्तार अधिकारी सांख्यिकीपदासाठी २ जागांसाठी १ हजार १५० व परिचरपदासाठी ४० जागांसाठी १६ हजार ९९० आले होते. सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत ही परीक्षा होती. दुपारी परिचरपदाची परीक्षा सुरू झाल्यानंतर पुणे शहरातील आगरकर मुलींच्या शाळेत जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे कर्मचारी त्यांच्याकडे या परीक्षेचा चार्ज नसताना परीक्षा सुरू असलेल्या एका वर्गात ते गेले. त्यांनी तेथे प्रश्नपत्रिकेची मोबाईलवरून फोटोकॉपी काढली. याला त्या वर्गातील उमेदवारांनी तीव्र आक्षेप घेतला. यानंतर येथे मोठा गोंधळ उडाला. हा प्रकार समजल्यानंतर भरारी पथकासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे तेथे पोहोचले. त्यांनी कसेबसे त्या उमेदवारांना समजावून सांगून शांत केले. त्यानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडली. मात्र उमेदवारांनी याला आक्षेप घेतल्याने तसेच परीक्षा प्रक्रियेवर संशय निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी ही परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरविले असून तसा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. (वार्ताहर)
दरम्यान, या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्या केंद्रावरील त्या वर्गाचे समन्वयकावरही निलंबनाची कारवाई केली आहे़

ही परीक्षा पुन्हा घेण्यात फारशी काही अडचण नाही. त्याच उमेदवारांना पुन्हा प्रवेशपत्र देऊन पुढील आठवडाभरात ती पुन्हा घेता येणार आहे़- कांतिलाल उमाप,
मुख्य कार्यकारी अधिकारी

Web Title: Suspension of one with 'that' employee in paper scanning case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.