पुणे : बाणेर परिसरातून चार वर्षांच्या मुलाची आठ दिवसांनंतर आज सुटका झाली. अपहरणकर्त्यानेच पुनावळे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला सोडून दिले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या जवळ असूनही पोलिसांनाअपहरणकर्त्यांचा शोध कसा लागला नाही, अपहरणकर्त्यांनी इतके दिवस मुलाला कसे ठेवले, त्यानंतर अचानक कसे सोडून दिले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ १० किलोमीटरच्या परिसरात मुलगा असतानाही पोलिसांना त्याचा शोध लागू शकला नाही.
बाणेर येथील बालेवाडी पोलीस ठाण्याच्या जवळून ११ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या मुलाचे अपहरण झाले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चतुश्रुंगी पोलीस, गुन्हे शाखेची विविध पथके यांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केले. त्या परिसराबरोबर तेथून जेथे जेथे रस्ते जातात, त्या सर्व परिसरातील सीसीटीव्ही, तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील फुटेज तपासण्यात आले. अगदी प्रत्येक इंच न् इंच तपासला. अपहरणकर्त्यांविषयीच्या सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात होत्या. परंतु, अपहरणकर्त्यांविषयी काहीही माहिती मिळाली नाही.
अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले?
शेवटी अपहरणकर्त्यांनीच त्याची स्वत: हून सुटका केली. आजवरच्या अपहरणाच्या घटनांमध्ये खंडणीसाठी अपहरण केले जाते. मात्र, या प्रकरणात खंडणी मागितली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळेच एकूण सर्व प्रकरणातील गूढ वाढले आहे. जर खंडणी मागितली गेली नाही तर अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले, नेमके अपहरणकर्ते किती आहेत, प्रथमदर्शनी स्वर्णवला पळवून घेऊन जाणाऱ्या एकाचेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्याचे अन्य साथीदार आहेत का?
चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?
सुटका झाल्यानंतर स्वर्णवकडे पाहिले असता तो व्यवस्थित दिसून येत आहे. त्याअर्थी या चार वर्षाच्या मुलाचा अपहरणकर्त्यांनी व्यवस्थित सांभाळ केलेला दिसून येत आहे. त्याला खाणे-पिणे व्यवस्थित दिलेले दिसून येत होते. त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वर्णव हा अपहरणकर्त्याला ओळखत होता का? चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?
अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलीस अयशस्वी
पुणे पोलिसांनी यापूर्वी अशाच लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेत मुलाची सुटका करण्यात अल्पावधीत यश मिळविले होते. त्याचबरोबर अपहरणकर्ते जेरबंद झाले होते. मात्र, त्या प्रकरणात अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.