ओझर : वारकरी संप्रदायाच्या विचारांच्या मार्गावर जीवनाचा प्रवास केला तर प्रत्येक व्यक्तीकडून महिलांचा सन्मान केला जाईल. महिलांचा सन्मान करणे हे आदर्श समाजव्यवस्थेचे प्रतीक असल्याचे मत महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी व्यक्त केले.जुन्नर तालुक्यातील खामगाव (भुंडेवाडी) येथे रामदास आढारी यांच्या वास्तुशांतीनिमित्त आयोजित कीर्तनसेवेत ते बोलत होते. ते म्हणाले, की बाजारात सर्व गोष्टी विकत मिळतील, पण शरीराचा एकही अवयव विकत मिळणार नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. शरीराबरोबर मनाची काळजी घेण्यासाठी विठ्ठलनामस्मरण हे प्रभावी माध्यम असून श्री विठ्ठलनामस्मरण करून हाताने टाळी वाजवली तर हृदयरोगासारख्या विकारावरही मात करता येते, हे वैज्ञानिकदृष्ट्यादेखील सिद्ध झाले असल्याने नामस्मरणाचा महिमा जपत वारकरी सांप्रदायांचे विचार आपल्या परिपूर्ण जीवनासाठी अंगीकारावेत.’’आढारी परिवार गेली सात वर्षे भजनी मंडळांना प्रतिवर्षी भजनसाहित्य देण्याच्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून या वेळी सुमारे पाच लाख रुपये किमतीचे टाळ, वीणा व पखवाज हे साहित्यवाटप बाबामहाराज सातारकर यांच्या हस्ते भजनी मंडळांना करण्यात आले. या वेळी संजयमहाराज बोरगे, चिन्मय सातारकर, गणेश सोनुने, रामदास आढारी, गुलाबमहाराज सणस आदी मान्यवर उपस्थित होते.(वार्ताहर)
महिलांचा सन्मान समाजाचे प्रतीक : सातारकर
By admin | Published: April 26, 2017 2:46 AM