पुणे: संत ज्ञानेश्वर माऊलीसह लाखो वैष्णवांनी टाळ मृदंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत अवघड दिवे घाट सहज पार केला . माऊलींच्या पालखीचे सासवडकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. रात्री आठ वाजता हा सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी सोपानकाकांच्या नगरीत विसावला. दिवे घाटात खासदार सुप्रिया सुळे वारीत सहभागी झाल्या होत्या.
माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी वारीला सुरुवात केली. वारीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत, वारकऱ्यांशी संवाद साधत, चिमुकल्यांबरोबर या सोहळ्याचा आनंद घेत वारीत सहभाग नोंदवला.''विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात दिवेघाटात काल सहभागी झाले. शतकांपासून वारकरी या मार्गवरुन पंढरीकडे मार्गस्थ होतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी, टाळ - मृदंगाच्या घोषात विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. तेव्हा अवघा रंग एक झाल्याचा अनुभव येतो अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.
दिवे घाट ते झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, पवारवाडी ते सासवडपर्यंत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. माउलींच्या दर्शनासाठी दिवे घाट परिसरात भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. विविध संस्था , संघटनांच्या वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. वडकी येथून दुपारी ३ वाजता सोहळा दिवेघाटाकडे मार्गस्थ झाला. साडेतीनच्या दरम्यान सोहळा दिवेघाटाच्या पायथ्याशी पोहोचला. रथाला वडकी, फुरसुंगी परिसरातील चार बैलजोड्या लावण्यात आल्या होत्या. टाळ मृदुगांचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत वैष्णवांनी दिवेघाट चढण्यास सुरुवात केली. दिवे घाट माथ्यावर विश्रांती घेऊन सोहळा सासवडकडे कडे मार्गस्थ झाला. पुणे ते सासवड ही वाटचाल जवळपास ३२ किलोमीटरची असल्याने हा मोठा प्रवास व या दिवशी एकादशी असल्याने उपवास असतो त्यामुळे वारकऱ्यांची पावले सासवडच्या दिशेने झपझप पडत होती.
वारीत तरुणांची संख्या लक्षणीय
दिवेघाट चढून माथ्यावर आलेल्या लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनी माउलींच्या सोहळ्या बरोबर चालून वारीचा आनंद घेतला. या सोहळ्यात तरुणांची संख्या लक्षणीय होती. पोलिसांनी घाटातील वाहनं पुढे काढून सोहळ्यातील गर्दी कमी केली. त्यामुळे घाटात वारकऱ्यांना भजनाचा आनंद घेता आला. माऊलीसह वैष्णवांनी झेंडेवाडी फाट्यावर विसावा घेतला. यानंतर पालखी सासवड मुक्कामी पोहचल्यानंतर माऊलींच्या पालखी तळावर समाज आरती झाली व सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावला