मिळकतकर विभागातर्फे ३७ मिळकतींना टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 02:59 AM2019-02-02T02:59:04+5:302019-02-02T02:59:11+5:30
पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
पुणे : मिळकतकर विभागाकडून गेल्या पाच दिवसांत ३७ मिळकतींना टाळे ठोकण्यात आले आहेत. यामध्ये मुंढवा, कोंढवा, पर्वती या भागांमधील मिळकतींचा समावेश आहे. पालिकेने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली असून महापालिका आयुक्तांनी मिळकतकराची वसुली करण्याचे आदेश दिल्याची माहिती सहमहापालिका आयुक्त तथा करआकारणी करसंकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
यंदा ३१ जानेवारीपर्यंत १ हजार १२ कोटी रुपयांची वसुली मिळकतकरापोटी झाली आहे. करसंकलन विभागाने वसुली पथकामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उद्दिष्ट ठरवून दिले आहे. हे उद्दिष्ट मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे. प्रशासनाने जानेवारी महिन्यात ४४.५५ कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली असून ज्यांनी अद्याप कर भरलेला नाही, त्यांच्यावर जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
थकबाकी भरावी
पालिकेने यापूर्वी तीन वर्षांत दोन वेळा अभय योजना राबवीत थकबाकी वसूल केली होती. त्यासाठी सवलतही देण्यात आली होती.
मात्र, चालू वर्षात ही योजना राबविण्यात येणार नाही. त्यामुळे थकबाकीदारांनी जप्तीची कारवाई
टाळण्यासाठी तत्काळ थकबाकी भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.