पुण्यात तडीपार गुंडांची दादागिरी; चायनीज स्टॉलचालकाला धमकावून उकळली खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 04:09 PM2022-01-18T16:09:24+5:302022-01-18T16:10:24+5:30
या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती
पुणे : तडीपार असताना आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉलचालकाला धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघा गुंडांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
शकील शब्बीर शेख (वय २३) आणि समीर शब्बीर शेख (वय २७, दोघे रा. लोहगाव) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत टिंगरेनगर येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात चायनीजची गाडी लावतात. फिर्यार्दी व त्यांचे २ कामगार चायनीज स्टॉलवर असताना ७ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता शकील शेख तेथे आला. त्याने फिर्यादी यांना ‘‘आपको समीर भाईने बोला था ना, चायनीज का स्टॉल चलाने का है तो महिने का १० हजार रुपये देना पडेगा ये ले समीर भाई से बात कर’’ असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला. त्यावर समीर शेख याने ‘‘तुला स्टॉल चालवायचा असेल महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,’’ अशी धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन शकील शेख याला १२०० रुपये काढून दिले. तेव्हा त्याने दर महिन्याला पैसे दिले नाही तर स्टॉल चालवू देणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती. काल त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत. शकील आणि समीर शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांना येरवडा पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांनी एका महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचा नेकलेस जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्याकडून ५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी तडीपार केले होते.