पुणे: वार शुक्रवार...मामलेदार कचेरीत दुपारची वर्दळ... नागरिकांची नेहमीची गर्दी.. यात याच वेळी सहसा घडत नाही अशी घटना घडली. तहसीलदारांनी चक्क आपल्या कार्यालयातून खालच्या मजल्यावर येऊन एका वृद्ध महिलेची सुनावणी घेतली. मुलीच्या त्रासाने वैतागलेल्या या वयोवृद्ध महिलेला तहसीलदारांच्या या कृतीने बरे वाटले. पुढच्या सुनावणीत थेट निकालच मिळेल असे सांगून तहसीलदारांनी त्या वृद्धेला अधिक दिलासा दिला.
मामलेदार कचेरीतील तहसीलदारांचे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर आहे. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायद्याखाली प्राप्त तक्रारींची तहसीलदार तृप्ती कोलते तिथे सुनावणी घेत होत्या. शुक्रवार पेठेतील एक महिलेने तिच्या मुलीविरूद्ध केलेल्या तक्रारीची फाईल सुरू झाली. तक्रारदार हजर नसल्याचे शिपायाने सांगितले. कोलते यांनी चौकशी केली तर त्या खाली आलेल्या आहेत, मात्र त्यांना जिना चढून येणे शक्य नाही असे समजले.
त्यानंतर कोलते यांनी कार्यालयातून थेट खाली जाऊन त्या आजींची भेट घेतली. तिथे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना पुढची तारीख दिली व त्यावेळी प्रकरणाचा निकालच देऊ असेही सांगितले. कोलते म्हणाल्या, त्यांच्या वयाचा विचार करता ते त्यांना खरेच शक्य नव्हते. तसेच त्यांच्या तक्रारीचे स्वरूप पाहिले तर त्यांच्या मुलींमध्ये भांडणे आहेत व त्यापैकीच एकजण त्यांना त्रास देत असल्याचे दिसते आहे. त्याची आता सविस्तर माहिती घेऊन त्यांचे नक्की समाधान करण्यात येईल. कार्यालयातून खाली यावे असे वाटले याचे कारण त्याचे वय व तक्रारीचे स्वरूप हेच आहे व त्यात विशेष असे काहीच नाही. नागरिकांना दिलासा देणे हेच तर अधिकाऱ्यांचे काम आहे' हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.