इंदापूर (पुणे) : खालच्या पातळीवरील एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आपणास तालुक्यात फिरु देणार नाही, अशी धमकी देणाऱ्या मित्र पक्षातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पध्दतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूरमधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात शेवटी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.