पुणेकर जरा जपून .. पाच महिन्यांत संपले धरणातील बारा टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:42 PM2019-05-06T12:42:27+5:302019-05-06T12:45:46+5:30
पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले.
पुणे: वाढत्या नागरिकारणामुळे पुणे शहर व परिसराला लागणा-या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मात्र,धरणातील पाणीसाठ्यात दुष्काळी परिस्थितीमुळे वाढ न होता घटच होत आहे. त्यातही गेल्या पाच महिन्यात खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १२ टीएमसी पाणी संपले आहे. जिल्ह्याची तहान वाढत असली तरी त्यावर वेळीच निर्बंध घालावे लागतील. तेव्हाच सर्व घटकांना समान पाणी देणे शक्य होईल,असे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
पुणे महापालिकेकडून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक पाणीवापर केला जातो. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि पालिका प्रशासन यांच्यात अनेक वेळा वाद निर्माण झाले. पाण्यावरून शहरी व ग्रामीण असा वाद पेटला आहे. ग्रामीण भागाला हक्काचे पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात आणि आता उच्च न्यायालयात पुण्याच्या पाणी प्रश्नावर न्याय मागितला जात आहे. केवळ लोकसंख्येच्या आधारे प्राधिकरणाकडून पालिकेला पाणी मंजूर केले जाते. परंतु, वाढीव लोकसंख्येचे पुरावे सादर करण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे शहराला वाढीव पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.
पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वितरणाचा करार संपुष्टात आला असला तरी पालिकेला हवे तेवढे पाणी दिले जात आहे. मात्र, त्यावर हरकत घेत इंदापूरचे शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते प्रताप पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेत राज्य शासनाला पुणे महापालिकेचे पाणी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी पालिकेला वाढलेल्या लोकसंख्येचे अचूक पुरावे सादर करणे भाग पडणार आहे. तसेच सध्या धरणातून पाणी उचलण्याची यंत्रणा पालिकेच्या ताब्यात आहे.परंतु, पुढील काळात पालिकेला मनमानीपध्दतीने पाणी उचलता येणार नाही. त्यामुळे पुणे शहराची वाढलेली तहान वेळीच आटोक्यात आणावी लागणार आहे.
पुणे महापालिका हद्दीत नवीन ११ गावांचा समावेश झाला आहे.मात्र,अद्याप या गावांमधील सर्व नागरिकांना पालिकेने पाणी उपलब्ध करून दिलेले नाही. लोकसंख्येचे पुरावे सादर करताना मात्र या ११ गावांमधील लोकसंख्या गृहित धरली आहे. या गावांमधील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याची वेळ आल्यावर सध्या धरणातून घेतले जात असलेले पाणी कमीच पडणार आहे. त्यामुळे वेळीच शहर व ग्रामीण भागाच्या वाढत चाललेल्या पाणी वापराचे योग्य नियोजन करावे लागणार आहे,असेही जलसंपदा विभागातील अधिका-यांनी सांगितले.
....
* खडकवासला धरण प्रकल्पात ५ जानेवारी रोजी १७.५१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता.धरणात ५ मे रोजी केवळ ५.६१ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.त्यामुळे शहरी व ग्रामीण भागाने गेल्या पाच महिन्यात ११.९ टीएमसी एवढा पाणी संपवला असल्याचे स्पष्ट होत आहे.५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या एक महिन्याच्या कालावधीत धरणातील ३.४३ टीएमसी पाणी संपले.तर ५ फेब्रुवारी ते ५ मार्च या महिन्याभराच्या काळात 2.7 टीएमसी तर ५ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान १.९४ टीएमसी आणि ५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत ३.८३ टीएमसी पाण्याचा वापर झाला.त्यामुळे गेल्या पाच महिन्यात शहर व ग्रामीण भागाने तब्बल बारा टीएमसी पाणी वापरले आहे.परंतु,पुढील काळात उपलब्ध धरणसाठा आणि पाण्याचा वापर यांचा ताळमेळ घालावा लागणार आहे.